Wed, May 22, 2019 16:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पोलीस महासंचालकांचा मुदतवाढ घेण्यास नकार

पोलीस महासंचालकांचा मुदतवाढ घेण्यास नकार

Published On: Aug 07 2018 1:41AM | Last Updated: Aug 07 2018 1:32AMमुंबई : अवधूत खराडे

राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी या पदावर मुदतवाढ घेण्यासाठी स्पष्ट नकार दिला असल्याची धक्कादायक माहिती खात्रीलायक सुत्रांकडून मिळते. पडसलगीकर हे या महिन्याच्या अखेरीस निवृत्त होत आहेत. पडसलगीकर यांच्या या निर्णयामूळे नुकतेच मुंबईचे पोलीस आयुक्त बनलेल्या सुबोधकुमार जयस्वाल यांना अवघ्या दोन महिन्यांतच या पदावरुन पायउतार व्हावे लागणार असल्याने गृहमंत्रालयासह राज्य पोलीस दलातील उच्चपदस्थ आयपीएस अधिकार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर हे जून महिन्याच्या अखेरीस सेवानिवृत्त झाल्याने मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची या जागेवर नियुक्ती करण्यात आली. पडसलगीकर यांना या पदावर अवघ्या दोन महिन्यांचा कार्यकाल मिळणार असल्याने त्यांना आणखी तीन ते सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याच्या गृहमंत्रालयाचा विचार होता. तशा चर्चाही आयपीएस लॉबीमध्ये सुरू होत्या. मात्र या चर्चांंना पूर्ण विराम देत पडसलगीकर यांनी या पदावर मुदत वाढ घेण्यास स्पष्ट नकार दिला असल्याचे खात्रिलायकरित्या समजते. मुदतवाढ घ्यायची की नाही हे सर्वस्वी संबंधीत अधिकार्‍याच्या इच्छेवर अवलंबून असते. त्यामुळे त्यांच्यवर दबावही टाकता येत नाही.

पडसलगीकर यांच्या या निर्णयामुळे सेवाज्येष्ठतेने मुंबईचे पोलीस आयुक्त सुबोधकुमार जयस्वाल यांना राज्याचे पोलीस महासंचालक बनाव  लागणार आहे. केंद्रीय गुप्तचर यंत्रणा रॉ मध्ये प्रतिनियुक्तीवर कार्यरत असलेल्या जयस्वाल यांना खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच शेवटच्या क्षणी राज्यामध्ये परत आणून त्यांच्या खांद्यावर मुंबई पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी सोपविली होती. जयस्वाल यांच्या नियुक्तीने अनेकांना धक्काही बसला होता. मात्र आता अवघ्या दोन महिन्यांतच त्यांना मुंबई पोलीस आयुक्तपदावरून पोलीस महासंचालक बनवावे लागणार असल्याने गृहमंत्रालयाची चांगलीच पंचाईत झाली आहे. जयस्वाल यांची पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती केल्यास पुन्हा एकदा मुंबई पोलीस आयुक्तपदासाठी आयपीएस अधिकार्‍यांमध्ये रस्सीखेच सुरू होणार आहे. त्यात गृहमंत्रालय ही आयुक्तपदाची माळ कोणाच्या गळ्यामध्ये टाकते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

निष्कलंक सेवा

राज्यामध्ये सध्या मराठा आंदोलनाचा वणवा पेटला आहे. त्यापाठोपाठ अन्य समाजांकडूनही आंदोलने पुकारण्यात आली आहेत. तसेच संप, मोर्चे यामुळे राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला असून येत्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर ही परिस्थिती चिघळण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात आणि केंद्रामध्ये आतापर्यंत निष्कलंक सेवा बजावलेल्या पडसलगीकर यांनाही हीच प्रतिमा घेऊन निवृत्त व्हायचे आहे, अशीही चर्चा पोलीस दलामध्ये सुरू झाली आहे. 

सेवाज्येष्ठतेनुसार कार्यरत अधिकारी

राज्य पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या आयपीएस अधिकार्‍यांमध्ये 1985 च्या बॅचचे सुबोधकुमार जयस्वाल यांच्या पाठोपाठ 1986 च्या बॅचचे एस. पी. यादव आणि संजय पांडे, तर 1987 च्या बॅचचे संजय बर्वे, बिपीन बिहारी, सुरेंद्र पाण्डेय, डी. कनकरत्नम आणि हेमंत नगराळे आणि 1988 च्या बॅचचे परमबीर सिंह, रश्मी शुक्‍ला, रजनीश सेठ, डी. व्यंकटेशम आणि एस. जगन्नाथ आदी रेसमध्ये असल्याची माहिती मिळते.

नाराज न्यायालयात जाण्याचाही अडसर

राज्य शासनाने पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना मुदतवाढ दिल्यास किंवा नियुक्त्यांमध्ये गटबाजी केल्यास वरीष्ठ आपीएस अधिकार्‍यांपैकी एखादा नाराज अधिकारीही न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. याही अडचणीचा सामना शासनाला येत्या काळात करावा लागू शकतो. त्यामुळे गृहमंत्रालयाच्या अडचणीत वाढ झाली आहे.