Wed, Nov 21, 2018 03:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रिफायनरी प्रकल्प लादणार नाही : मुख्यमंत्री

रिफायनरी प्रकल्प लादणार नाही : मुख्यमंत्री

Published On: Mar 15 2018 1:19AM | Last Updated: Mar 15 2018 1:19AMमुंबई : प्रतिनिधी 

नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाला कोकणातील नागरिकांचा वाढता विरोध असल्याने हा प्रकल्प तेथील जनतेवर लादणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समितीला दिली. मात्र जनतेचा विरोध लक्षात घेऊन या प्रकल्पाबाबत जनजागृती करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. समितीतर्फे बुधवारी आझाद मैदानात शक्तीप्रदर्शन करण्यात आले व हा प्रकल्प सरकारने त्वरित रद्द करण्याची मागणी करण्यात आली. 

समितीच्या शिष्टमंडळाने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांची विधान भवनात भेट घेतली त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही ग्वाही दिली. मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात समितीचे अध्यक्ष अशोक वालम, नितीन जठार, सत्यजित चव्हाण,रामचंद्र भडेकर, अश्‍विनी वालम, सत्यवान पाळेकर, मजीद भाटकर, संजय राणे, सीमा वालम, सोनाली ठुकरूल, नेहा दुसणकर यांचा समावेश होता.

समृध्दी महामार्गालादेखील नागरिकांचा विरोध होता मात्र आता हा विरोध मावळला आहे. त्याप्रमाणे या प्रकल्पाची चांगली बाजू समोर आल्यावर विरोध मावळला जाईल, अशी आशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. 

उपोषण मागे, आंदोलन सुरूच राहणार 

कोकणातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला सर्वांचा विरोध आहे, त्यामुळे जोपर्यंत हा प्रकल्प रद्द होत नाही व औद्योगिक क्षेत्राबाबतचा अध्यादेश मागे घेतला जात नाही तोपर्यंत प्रकल्पाविरोधातील आंदोलन सुरू राहील, असा निर्धार कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समितीने केला आहे. समितीतर्फे आझाद मैदानात प्राणांतिक उपोषण सुरू करण्यात आले होते मात्र मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर ते मागे घेण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दाचा मान ठेवून आम्ही उपोषण स्थगित करत आहोत. मात्र प्रकल्पाविरोधात आंदोलन सुरूच राहील असा निर्धार अशोक वालम यांनी व्यक्त केला.  प्रकल्प राबवण्यासाठी सक्ती केली जाणार नाही मात्र प्रकल्पाबाबत जनजागृती करण्यात येईल. याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्याची माहिती वालम यांनी दिली. प्रकल्पबाधित ग्रामस्थांनी ग्रामसभांचा ठराव करून या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे.