Thu, Jul 18, 2019 12:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रिफायनरीः मुख्यमंत्री-सेनेत जुंपली

रिफायनरीः मुख्यमंत्री-सेनेत जुंपली

Published On: Dec 21 2017 2:10AM | Last Updated: Dec 21 2017 1:10AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

कोकणातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेत चांगलीच जुंपली आहे. कोकणात होऊ घातलेल्या विनाशकारी पेट्रोकेमिकल प्रकल्पाला स्थानिक जनतेबरोबर शिवसेनेने पहिल्यापासूनच विरोध केलेला आहे. मात्र मुख्यमंत्री याबाबत खोटी माहिती देऊन जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. रिफायनरी प्रकल्पासाठी शिवसेना खासदार व मंत्र्यांनी आग्रह धरल्याचे पुरावे मुख्यमंत्र्यांनी सादर करावे, असे आव्हानच राऊत यांनी दिले आहे. 

कोकणात रिफायनरी व्हावी, यासाठी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते आणि खासदार विनायक राऊत हे आग्रही होते. त्यांनी प्रयत्न केल्याने कोकणात रिफायनरी होत असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना केले होते. 

राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे यांनी याच मुद्यावरून शिवसेनेला लक्ष केले आहे. यामुळे विनायक राऊत चांगलेच संतापले असून मुख्यमंत्र्याचे विधान धांदात असत्य असल्याचे म्हटले आहे. 

माझी सदसदविवेकबुद्धी आजही शाबूत आहे. राजापुर अथवा कोकणात कोठेही प्रकल्प यावा यासाठी कधीही आपण कोणाला भेटलो, अथवा विनंती केलेली नसल्याचे राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पेट्रोलियम मंत्री यांना आपण भेटून प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या निवेदन दिले असेल किंवा संसदेत कधी मागणी केली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांकडे असेल तर त्यांनी ती तात्काळ लेखी स्वरुपात मला उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे.