होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाराष्ट्रात 72 हजार जागांची महाभरती!

महाराष्ट्रात 72 हजार जागांची महाभरती!

Published On: May 16 2018 8:55PM | Last Updated: May 16 2018 8:55PMमुंबई : प्रतिनिधी

शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावण्यासाठी ग्रामीण भागातील अत्यावश्यक  सेवासुविधा पुरविण्याकडे राज्य सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यात दोन वर्षात कृषी व ग्रामीण विभागाशी संबंधित 72 हजार पदांची भरती केली जाणार आहे. या आर्थिक वर्षात 36 हजार पदांची मेगा भरती केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भरतीला बुधवारी मान्यता दिली. बेरोजगारी हा ग्रामीण भागात मोठा प्रश्‍न असून, त्यालाच थेटपणे हात घालून सरकारने खेड्याकडे वाटचाल करत निवडणूक तयारी सुरू केली आहे.

राज्य सरकारने ग्रामीण विकासावर भर देण्याचे ठरविले असून, त्यासाठी रिक्‍त असलेली व निकडीची गरज असलेली 72 हजार पदे भरण्याचे ठरविले होते. मात्र, राज्याच्या तिजोरीवरील ताण पाहता त्याबाबतचा कालावधी निश्‍चित करण्यात आला नव्हता. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यापैकी 36 हजार पदे भरण्याच्या निर्णयावर शिक्‍कामोर्तब करण्यात आले. तर उर्वरित 36 हजार जागा या पुढील वर्षी भरल्या जाणार आहेत. यंदा ज्या 36 हजार जागांची मेगा भरती केली जाणार आहे त्या सर्व जागा या चालू आर्थिक वर्षातच भरल्या जाणार आहेत.

ग्रामीण भागातील रिक्‍त जागांमुळे तेथाल जनजीवनावर विपरीत परिणाम झाल्याबाबत लोकप्रतिनिधींनी तक्रारींचा सूर लावला होता. त्यावर  गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या प्रशासनातील विविध पदांच्या रिक्‍त असलेल्या 72 हजार  जागा दोन टप्प्यात भरण्यात येणार असल्याची घोषणा केली होती.

यावर्षीच्या 36 हजार जागा भरताना ग्रामीण भागातील प्रशासकीय यंत्रणा सक्षम करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. विशेषत:, कृषी व ग्रामीण विकासाशी संबंधित या जागा अग्रक्रमाने भरण्यात येणार आहेत.

शेती क्षेत्राच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासाठी शेतीच्या शाश्‍वत विकासासह शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावण्यावर भर दिला जाणार आहे. शेतकर्‍यांकरिता विविध महत्त्वाकांक्षी योजना आखून त्यांची, तसेच विविध अभियान व उपक्रमांना गती देण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. ही गती देताना रिक्‍त पदांमुळे येणारा अडसर पद भरती करून दूर केला जाणार आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील जनतेला विविध पायाभूत सुविधा देताना व त्यांना जीवनावश्यक सुविधा पुरविताना येणार्‍या अडचणीही या पद भरतीने दूर होणार आहेत.