Tue, May 21, 2019 12:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › औरंगाबाद येथील शिवीगाळ प्रकरण

चंद्रकांत खैरेंवर कारवाईची शिफारस

Published On: Sep 08 2018 1:32AM | Last Updated: Sep 08 2018 1:16AMमुंबई : प्रतिनिधी  

न्यायालयाच्या आदेशानंतर बेकायदा  मंदिरावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पालिका अधिकार्‍यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी वादाच्या भोवर्‍यात अडकलेले औरंगाबादचे   शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांच्या अडचणीत भर पडली आहे. याप्रकरणी राज्याच्या विधी आणि न्याय विभागाने  कायदेशीर कारवाई करण्याची शिफारस केली आहे, अशी माहिती शुक्रवारी उच्च न्यायालयात उघड झाली. मात्र राज्य सरकारला यावर भूमिका स्पष्ट करता न आल्याने याचिकेची सुनावणी सोमवार 10 सप्टेंबर रोजी होणार आहे.

उच्च न्यायालयाने राज्यातील बेकायदा प्रार्थनास्थळे तसेच धार्मिक स्थळांविरोधात  कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार औरंगाबादमधील वाळूंज येथील बेकायदेशीर मंदिरावर कारवाई करण्यास गेलेल्या पालिकेच्या अधिकार्‍यांना खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिवीगाळ केली. याची दखल घेऊन न्यायालयाने दोन वर्षांपूर्वी कारवाईचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतरही कोणतीच कारवाई होत नसल्याने याचिकाकर्ते भगवान रयानी यांनी हा मुद्दा उच्च न्यायालयात नेला होता. 

न्यायालयाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करून कारवाई केव्हा करणार, अशी विचारणा गेल्या सुनावणीच्यावेळी केली होती. या याचिकेवर शुक्रवारी न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती एम. एस. सोनक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी राज्याच्या विधी व न्याय विभागाने खासदार खैरे यांच्याविरोधात कारवाई करण्यास हिरवा कंदील दिल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली. मात्र त्यावर राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करण्यास सरकारी वकिलांना अपयश आल्याने न्यायालयाने याचिकेची सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब ठेवली.