Tue, Apr 23, 2019 19:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › परीक्षक पदावरून पपॉन पायउतार

परीक्षक पदावरून पपॉन पायउतार

Published On: Feb 25 2018 1:42AM | Last Updated: Feb 25 2018 1:29AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

अल्पवयीन मुलीचे चुंबन घेतल्याने वादाच्या भोवर्‍यात सापडलेला द व्हॉईस इंडिया किड्स या रिअ‍ॅलिटी शो परीक्षक गायक पपॉन हा परीक्षकपदावरुन पायउतार झाला आहे. यासंबंधीची माहिती त्याने ट्वीट करुन दिली आहे. 

माझी व्यावसायिक बंधने पूर्ण करण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे मी परीक्षकपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला  आहे. या प्रकरणात मला चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आले आहे. या प्रकरणावर योग्य तो तोडगा निघत नाही आणि चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत मी या पदावर राहणार नाही. न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्‍वास असून, सत्य निश्‍चित लोकांसमोर येईल, असे त्याने म्हटले आहे. दरम्यान, या आठवड्याच्या प्रारंभी पपॉन एक अल्पवयीन स्पर्धक मुलीचे चुंबन घेतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. राष्ट्रीय बालहक्‍क संरक्षण आयोगाने शुक्रवारी पपॉन आणि वाहिनीला नोटीस बजावली आहे. 

याप्रकरणावरुन सिने जगतातही दोन तट पडले आहेत. काही सेलिब्रिटींनी पपॉनला पाठिंबा दिला आहे, तर काहींनी या कृत्याबद्दल पपॉनचे कान उपटले आहेत. रायझिंग स्टार या कार्यक्रमाची परीक्षक गायिका मोनाली म्हणते, मला यासंदर्भात काल खूप फोन आले. या प्रकरणाला चुकच्या पद्धतीने मांडले जात आहे. मी एक मुलगी आहे, आणि कोणता स्पर्श कसा आहे, हे मला चांगलेच कळते.

याउलट अभिनेत्री रविना टंडन हिने ट्वीट करुन, पपॉनला चांगलेच धारेवर धरले आहे. ती म्हणते, परिस्थिती कोणतीही असो, अपघाती, निष्काम, प्रेमाची, किंवा प्रशंसेची. पपॉन प्रकरण दुर्दैवी आहे. मात्र ते अनेकांचे डोळे उघडणारे आहे. कोणीही कोणत्याही परिस्थितीत मर्यादांचे उल्‍लंघ करु नये, असे रविनाने म्हटले आहे.