Fri, Mar 22, 2019 23:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विरोधकांकडे सरकारविरोधात ठासून दारूगोळा

विरोधकांकडे सरकारविरोधात ठासून दारूगोळा

Published On: Jul 02 2018 1:51AM | Last Updated: Jul 02 2018 1:37AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

नागपूरमध्ये बुधवारपासून होणार्‍या पावसाळी अधिवेशनात सरकारवर हल्ला करण्यासाठी विरोधकांनी भरपूर दारूगोळा जमविला आहे. सरकारची कोंडी करण्यासाठी विरोधक एकत्र येणार असल्याची कुणकुण लागल्याने सत्ताधारी भाजपनेही रणनीती आखली आहे. मात्र नाणार प्रकल्प, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, कर्जमाफी, शेतमालाला योग्यदर, पाकिस्तानच्या आयात साखरेवरून शिवसेनासुद्धा विरोधाची भूमिका घेणार असल्याने भाजप सावध पावले टाकणार आहे.

राज्यातील शेतकर्‍यांना 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर केली. प्रत्यक्षात 14 हजार कोटींचीच कर्जमाफी देण्यात आली आहे.  शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढतच असून 1 जानेवारी ते 30 एप्रिल 2018 पर्यंत एकूण 698 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी मदतीसाठी केवळ 288 शेतकरी पात्र ठरले आहेत. नाणारला विरोध असतानाही प्रकल्प उभारणीबाबत करार केल्यामुळे शिवसेना भाजपवर दात खाऊन आहे. पावसाळी अधिवेशनात त्याचे पडसाद उमटणार आहेत. अशावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून आगीत तेल टाकण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 

शिवसेनासुद्धा शेतकर्‍यांची बाजू घेणार असल्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढणार आहे. नोंदणी केलेल्या शेतकर्‍यांकडून व्यापार्‍यांनी हमीभावापेक्षा कमी दराने तूर, हरभरा, धान व सोयाबीन खरेदी केले आहे. नोटबंदीमुळे अडचणीतील सहकारी बँका अजूनही सावरल्या नाहीत. विविध योजनांसाठी काढलेल्या कर्जाची परतफेड बाजूला ठेवून तूरडाळ खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी आकस्मिकता निधीतून 1570 कोटी काढल्याबाबत विरोधक जाब विचारणार आहेत.    

दूध उत्पादक व शेतकर्‍याच्या संपाबाबत समाधानकारक तोडगा निघाला नाही. राष्ट्रीयीकृत बँकांना निधी पुरवून एनपीएतून बाहेर काढणार्‍या केंद्राने शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी छदामही दिला नाही. संकटातील साखर उद्योगाला सावरण्याऐवजी केंद्राने पाकिस्तानमधून साखर आयात केल्याचा राग काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या साखरसम्राट आमदारांना आहे. आपला संताप ते याच अधिवेशनात काढणार आहेत. डिजिटल इंडिया, स्टार्ट अप, मेक इन महाराष्ट्र व मॅग्नेटिक महाराष्ट्रसारख्या योजनांची सरकारने घोषणा केली असली तरी अद्यापही बेरोजगारीची समस्या कायम आहे. बुलेट ट्रेन आणि आणीबाणीत तुरुंगवास झालेल्यांना निवृत्तिवेतनावर विरोधक सरकारला धारेवर धरणार आहेत.