Mon, Aug 19, 2019 07:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रेडी रेकनरचे दर जैसे थे!

रेडी रेकनरचे दर जैसे थे!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

बांधकाम व्यवसायात गेल्या काही वर्षांपासून आलेल्या मंदीमुळे रेडी रेकनर दर जैसे थे ठेवणे सरकारला भाग पडले आहे. मंदीने ग्रासलेले व्यावसायिक आणि गृहखरेदीदार, दोघांनाही हा दिलासा मानला जात आहे. 

चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी नोंदणी विभागाच्या महानिरीक्षकांनी जारी केलेल्या आदेशात, बांधकाम क्षेत्राच्या बाजारपेठेतील मंदीचे वातावरण पाहता, 2017-18 चे रेडी रेकनर दर 2018-19 साली कायम राहतील, असे नमूद करण्यात आले आहे. 

यासदंर्भात बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, यावर्षी नियमांत करण्यात आलेल्या सुधारणा आणि बांधकाम क्षेत्रात असलेले वातावरण यामुळे दर जैसे थे ठेवणे भाग पडले आहे. रेडी रेकनर दरात 7 टक्क्यांनी वाढ करण्याचा प्रस्ताव होता. मात्र हे दर अगोदरच अधिक असल्यामुळे ते जैसे थे ठेवण्याचे ठरविण्यात आले, असे ते म्हणाले.  

मुंबई 700 भागांत विभागलेली आहे. या प्रत्येक भागासाठी रेडी रेकनर दर प्रतिवर्षी निर्धारित करण्यात येतात. गेल्या पाच वर्षांत ते प्रतिवर्षी 6-7 टक्क्यांनी वाढविण्यात आले होते. 1995, 1996, 1997 आणि 2001 साली मात्र या दरांत कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. उलट ते कमी करण्यात आले होते. 

बांधकाम क्षेत्रातील मूल्यांकन तज्ज्ञांच्या मतानुसार, रेडी रेकनर दर कमी करण्याची संधी सरकारने गमावली आहे. तसेच मुद्रांक शुल्क बिल्ट अप एरियावरून कार्पेट एरियावर आणण्याची संधीही दवडण्यात आली आहे. 

रेरा कायद्यानुसार खरेदी केलेल्या घराची नोंदणी कार्पेट एरियावर असणे आवश्यक आहे. मात्र मुद्रांक शुल्क बिल्ट अप एरियावर आकारणे बंधनकारक आहे. यासंदर्भातील सुधारणा करणे शक्य होते, मात्र सरकारने तसे केलेले नाही.तसे केले असते, तर मुद्रांक शुल्कात 10 टक्क्यांनी सुधारणा झाली असती आणि घरांच्या किमतीतही फरक पडला असता, असे तज्ज्ञांचे मत आहे. 

बांधकाम व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार रेडी रेकनर दर 2016 च्या तालिकेप्रमाणे ठेवणे आवश्यक होते. तसे झाले असते, तर विक्रीत वाढ झाली असती. जीएसटीमुळे गृहखरेदीदारांवर अधिकचा भार पडत आहे. त्यामुळे विक्री मंदावली आहे, असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. 

महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री आणि क्रेडाईने रेडी रेकनर दर 25 टक्क्यांनी कमी करण्याची मागणी केली होती. 

Tags : Ready, Reckoner, Rates, issue, mumbai news,


  •