Mon, Aug 19, 2019 06:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रेमण्डच्या जागेवर स्मशानभूमीचा ठराव

रेमण्डच्या जागेवर स्मशानभूमीचा ठराव

Published On: Apr 21 2018 10:44AM | Last Updated: Apr 21 2018 10:44AMठाणे : खास प्रतिनिधी

स्मशानभूमीच्या जागेवरून शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के यांचा वाद रस्त्यावर आल्याने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेऊन त्यावर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला. परंतु शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षांनी स्मशानभूमीबाबत प्रशासनाची केलेली कोंडी फोडताना सभागृहनेते नरेश म्हस्के यांनी रेप्टाकोर्स आणि निळकंठ येथील स्मशानभूमी बांधण्याचा ठराव आम्हीच केला होता परंतु नागरिकांच्या विरोधानंतर तो बदलण्याचा निर्णय घेतला.

 मी आमदार, खासदारकीसाठी नाही तर पक्षाच्या आदेशानुसार भूमिका घेतल्याचे सांगताना त्यांनी जर्ब गिधड की मौत आती है ! तब वो स्मशानभूमी के तरफ भागता है ! अशी टिप्पणी करून एकच खळबळ उडवून दिली आहे. दरम्यान, रेमंड कंपनीच्या जागेत स्मशानभूमी बांधण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वर्तकनगर येथील रेप्टाकोर्स आणि मानपाड्यातील मुल्लाबाग येथील स्मशानभूमीवरून झालेल्या वादावर पडदा टाकण्यात आला.

 रामबाग येथील स्मशानभूमी अद्ययावत करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला विरोधी पक्ष नेते मिलिंद पाटील, स्थानिक नगरसेवक हणमंत जगदाळे, आमदार संजय केळकर यांना का बोलावण्यात आले नाही, याचा जाब माजी विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला, नारायण पवार, मिलिंद पाटणकर यांनी विचारल्याने स्मशानभूमीसाठी घेतलेल्या बैठकीवरून नव्या वादाला तोंड फुटले. त्यावेळी प्रशासनाची कोंडी झाली. ही कोंडी फोडताना नगरसेविका परिषा सरनाईक यांनी घोडबंदर, वतर्कनगर येथे स्शमानभूमी हवी पण कुठल्या जागेत हवी, अशी कोणतीही मागणी केली नसल्याचे स्पष्ट केले.

 त्यानंतर नजीब मुल्ला यांच्या  सूचनेनुसार रेमंड कंपनीच्या जागेवर स्मशानभूमी बांधण्याचा ठराव विरोधी पक्ष नेते मिलिंद पाटील यांनी मांडला आणि त्यास सभागृहनेते म्हस्के यांनी अनुमोदन दिले. अनुमोदन देताना म्हस्के यांनी स्वपक्षीयांसह विरोधी पक्षांना खडेबोल सुनावले.  ते म्हणाले, मी सोन्याचा चमच्या घेऊन राजकारणात आलो नाही. आमदार, खासदार बनण्याचे माझ्यापुढे अनेक प्रसंग आले होते. मी नेहमी पक्ष श्रेष्ठींना विचारून सभागृहात भूमिका मांडतो. पक्षाच्या तत्वापुढे आमदार, खासदारीचे पद काहीच नाही. अन्यथा आतापर्यंत 17 पक्ष बदलले असते.

इतरांप्रमाणे स्वार्थासाठी पक्षात आलेलो नाही, म्हणूनच पक्षश्रेष्ठींचा आदेश पटो वा न पटो मी सभागृहात भांडतो, भूमिका मांडतो. मग कुणी माझ्यावर बिल्डरचे पैसे खाल्ले, बिल्डरची सुपारी घेतली, असे आरोप केले तरी डगमगलो नाही, कारण पक्षश्रेष्ठींचा माझ्यावर विश्‍वास आहे आणि तीच माझी सुपारी असल्याचे सांगून त्यांनी पक्षस्वक्षीयांसह विरोधी पक्षांमधील टिकाकारांवर तोफ डागली. 

माझ्याकडे बरेच काही सांगण्यासारखे ओह, पण तोंड उघडणार नाही, असा गर्भीत इशाराही म्हस्के यांनी देत आमदार सरनाईक यांच्या आरोपांना उत्तर देण्याचे प्रयत्न केले.  रेप्टाकोर्स आणि मुल्लाबाग या जागेचा प्रस्ताव प्रशासनाने आणला. कुणाला भावी आमदार व्हायचा हा त्यानंतरचा प्रश्‍न आहे. आता स्मशानभूमीबाबतचे राजकारण थांबवा, तत्व, इच्छा, लोकांचा विचार सगळ्या गोष्टींचा करावा, असा टोला सरनाईक यांनी नाव न घेता सभागृहनेते म्हस्के यांना लगावला.

Tags : Raymond, Company, Graveyard, Thane