Thu, Jul 18, 2019 00:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राऊत, गोंधळेकर, कळसकरचे संभाषण सांकेतिक भाषेत

राऊत, गोंधळेकर, कळसकरचे संभाषण सांकेतिक भाषेत

Published On: Aug 19 2018 1:41AM | Last Updated: Aug 19 2018 1:30AMमुंबई : प्रतिनिधी

राज्यामध्ये घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असल्याच्या मिळालेल्या गुप्त माहितीवरून राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या हिंदूवादी संघटनेच्या वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांनी संभाषणासाठी कोडवर्डस् चा मोठ्या प्रमाणात वापर केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या कोडवर्डसचा उलगडा करण्यासोबतच आरोपींजवळ मोठ्या प्रमाणात सापडलेली स्फोटके, स्फोटकांचे साहित्य आणि शस्त्रसाठ्याबाबत पुढील तपासासाठी तिघांच्याही कोठडीमध्ये न्यायालयाने 10 दिवसांची वाढ केली आहे. तिन्ही आरोपींच्या कोठडीची मुदत शनिवारी संपत असल्याने एटीएसच्या पथकाने त्यांना सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.

एटीएसने 9 ऑगस्टच्या रात्री आणि 10 ऑगस्टच्या सकाळी नालासोपारा, तसेच पुणे परिसरात छापेमारी करत तिघांनाही बेड्या ठोकल्या होत्या. राऊत याच्या घरासह घराशेजारील दुकान गाळ्यातून मोठ्या प्रमाणात स्फोटके, साहित्य आणि महत्त्वपूर्ण दस्तऐवज ताब्यात घेतले होते. त्यानंतर तिघांच्याही चौकशीतून पूणे, नालासोपारा आणि सोलापूरमध्ये छापेमारी करून मोठा शस्त्रसाठा आणि लॅपटॉप, हार्डडीक्स, पेन ड्राईव्ह, मोबाईल, सीमाकार्डस् अन्य महत्वाचा दस्तऐवज ताब्यात घेतला आहे. यात संभाषणासाठी मोठ्याप्रमाणात कोर्डवर्डसचा वापर करण्यात आला असल्याने तिघांकडेही कसून चौकशी सुरू आहे. 

राऊत, कळसकर आणि गोंधळेकर यांची पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने एटीएसने शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास तिघांनाही सत्र न्यायालयात हजर केले. यावेळी आतापर्यंत केलेला गुन्ह्याचा तपासाची केस डायरी आणि अन्य महत्वपूर्ण कागदपत्रे पोलिसांनी न्यायालयात सादर केली. तसेच गुन्ह्याची असलेली अधिक व्याप्ती आणि सुुरू असलेल्या तपासासाठी आरोपींच्या कोठडीमध्ये वाढ करण्याची मागणी तपासअधिकार्‍याने न्यायालयात केली. तिन्ही आरोपींनी संभाषणासाठी वापरलेले कोडवर्डस, लिखित मॅसेज, हार्डडीस्क, मोबाईल्सचे सीडीआर, सीसीटीव्ही फुटेज, गाड्यांच्या नंबरप्लेटस यांच्या पडताळणींसह मोठ्या प्रमाणात सापडलेली स्फोटके व स्फोटकांचे साहित्य आणि शस्त्रास्त्रे याबाबत तीन्ही आरोपींकडे चौकशी करण्याची आवश्यकता आहे. तसेच अन्य पुरावे, साक्षीदार, घटनास्थळांवरचे पंचनामे करण्यात येत असून यासाठी आरोपींच्या वाढीव कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केली.

सकृतदर्शनी तीन्ही आरोपींकडे फक्त स्फोटके, साहित्य आणि शस्त्रास्त्रे सापडली असल्याचे पोलिसांनी म्हटले असले तरी त्यांना अटक केल्यापासून आजतागायत या तिघांचा हेतू काय होता? हे अद्याप पोलिसांनी स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे गुन्ह्यामध्ये वापरलेले देशविघातक कारवायांसाठीचे कलम चुकीचे असून त्यानुसार आरोपींना वाढीव कोठडी देऊ नये. तसेच तिघांचीही चौकशी करण्यात आली असून त्यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. त्यामुळे अन्य तपासासाठी आरोपींच्या कोठडीमध्ये वाढ करण्याची आवश्यकता नसून कोठडीमध्ये वाढ करू नये असा युक्तिवाद आरोपींच्या वतीने अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांनी न्यायालयात केला.

गुप्त बातमीवरून सुरू करण्यात आलेला तपास आणि त्यानंतर करण्यात आलेल्या छापेमारीमध्ये मोठ्या प्रमाणात सापडलेली स्फोटके, स्फोटकांचे साहित्य, शस्त्रास्त्रे आणि महत्त्वांच्या दस्तऐवजानंतरच तिन्ही आरोपींविरोधात देशविघातक कारवाया केल्याच्या कलमासह हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यानंतर न्यायालयाने आरोपींच्या कोठडीत 10 दिवसांची वाढ करण्याचे आदेश दिले.

एटीएसच्या पथकाने राऊत, कळसकर आणि गोंधळेकर यांना न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपींच्या पिंजर्‍यात बसविण्यात आले. राऊत आणि कळसकर हे दोघे पिंजर्‍यातील पुढील, तर गोंधळेकर हा मागील बाकावर बसला होता. तिघेही शांतपणे आणि निर्विकार चेहर्‍याने न्यायालयात सुरू असलेले कामकाज ऐकत होते. कळसकर याचा भाऊ कृष्णा याच्यासह अन्य एका नातेवाईकाला न्यायालयातच भेटण्याची परवानगी देण्यात आली. तसेच अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांनी आरोपींना भेटण्यासाठी केलेल्या अर्जावरुनही दोन्ही पक्षांमध्ये काही काळ प्रश्‍न आणि प्रतिउत्तर झाले.

एटीएसने वेळोवेळी चुकीच्याच कारवाया करून हिंदुत्ववादी संघटनांना टार्गेट केले आहे. यावेळी मात्र त्यात राजकीय हेतू मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. तिघांकडेही जर स्फोटके आणि शस्त्रसाठा सापडला असला तरी एटीएस आणि गृहमंत्रालय त्यांचा यामागे काय हेतू होता, हे अद्याप स्पष्ट करू शकलेलेे नाही. तसेच एटीएसकडून बेकायदेशीर ताबा घेऊन करण्यात आलेल्या मारहाणीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही लेखी पत्र दिल्यानंतर सोलापूरमधून काही शस्त्रे जप्तीच्या कारवाईवरही अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना बोट ठेवले.