Fri, Apr 26, 2019 03:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रत्नागिरी मत्स्य महाविद्यालय विदर्भाला जोडण्याचा घाट!

रत्नागिरी मत्स्य महाविद्यालय विदर्भाला जोडण्याचा घाट!

Published On: Apr 30 2018 2:00AM | Last Updated: Apr 30 2018 1:51AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

कोकणात मत्स्य विज्ञान विद्यापीठाची मागणी पूर्ण करण्याऐवजी डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाशी सलंग्न असलेले रत्नागिरी जिल्ह्यातील शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालय विदर्भात हलविण्याचा घाट घातला जात आहे.  हे महाविद्यालय नागपूरमधील महाराष्ट्र पशू आणि मत्स्य व्यवसायशास्त्र विद्यापीठाला (माफसू) जोडण्याचा राज्य सरकार विचार करत आहे. 

राज्य सरकारने 1981 मध्ये शिरगाव येथे मत्स्य महाविद्यालयाची स्थापना केली होती. येथे काम सुरळीत सुरू असताना तत्कालीन काँग्रेस सरकारने 2000 मध्ये हे महाविद्यालय विदर्भातील माफसूला जोडण्याच्या हालचाली केल्या होत्या. पण कोकणातील नेत्यांच्या विरोधामुळे सरकारने माघार घेतली. आता राज्यात भाजप सत्तेवर आल्यापासून सरकारने या महाविद्यालयाला विदर्भाला जोडण्याच्या जोरदार हालचाली सुरू केल्या असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघाचे अध्यक्ष रामदास संदे यांनी दिली.

इतर विभागांच्या तुलनेने कोकणामध्ये समुद्र, धरण, नदी आणि खाड्या असल्यामुळे मत्स्यशेतीची सर्वाधिक संधी आहे. 2007 मध्ये केरळ आणि 2010 मध्ये तामिळनाडूमध्ये मत्स्य विद्यापीठ सुरू झाले. त्याच धर्तीवर रत्नागिरीतही मत्स्य विद्यापीठ स्थापन व्हावे, अशी मागणी आहे. पण गेल्या बारा वर्षांपासून दुर्लक्ष करत आहे. शिरगावच्या मत्स्य महाविद्यालयातून आतापर्यंत 1200 विद्यार्थी पदवी व 300 विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.

या महाविद्यालयास भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे मानांकन मिळत असताना मानांकन नसलेल्या मत्स्यविज्ञान विद्यापीठाशी हे महाविद्यालय जोडण्याच्या हालचाली कोकणातील विद्यार्थ्यांवर अन्याय करणार्‍या आहे. तसेच हे महाविद्यालय माफुसला जोडल्यास मानांकन रद्द होण्याचा धोका असल्याची भीतीही संदे यांनी व्यक्त केली. नागपुरात मच्छीमारीसाठी कसलेही नैसर्गिक स्रोत नसताना शिरगावचे महाविद्यालय विदर्भाशी जोडणे व्यवहार्य ठरणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मत्स्यव्यवसायासाठी समृध्द असलेल्या कोकणाला झुकते माप देण्याऐवजी शासनाने पूर्व विदर्भातील जिल्ह्यामध्ये मत्स्य शेतीसाठी विशेष प्रोत्साहन योजना राबविण्याची घोषणा केली आहे.

गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांतील कास्तकार हे धानाची म्हणजे भातशेती करतात. भात पीक काढून झाल्यानंतर त्या शेतजमिनीत पाणी काही महिने टिकून राहते. या पाण्याचा वापर करून मत्स्यशेती केली जाते. अशा शेतकर्‍यांना शासनाच्या वतीने अर्थसहाय्य तसेच मत्स्यबीज खरेदी व संवर्धनासाठी सबसिडी दिली जाणार आहे. त्यानुसार कोकणातील मत्स्यव्यवसायाकडे सरकारने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा संदेंनी व्यक्त केली आहे.

Tags : Mumbai, mumbai news, Ratnagiri Fisher College,Vidarbha  connect ,