Wed, Feb 20, 2019 09:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › फिरायला नेऊन तरुणीवर बलात्कार

फिरायला नेऊन तरुणीवर बलात्कार

Published On: Jul 23 2018 1:09AM | Last Updated: Jul 23 2018 12:43AMमुंबई : प्रतिनिधी

छोटा काश्मिर दाखवण्याच्या बहाण्याने जंगलामध्ये नेत एका नराधमाने 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना गोरेगावमध्ये घडली आहे. ही तरुणी गर्भवती राहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली असून आरे पोलिसांनी याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

गोरेगावच्या संतोष नगर परिसरात राहात असलेल्या 20 वर्षीय तरुणीसोबत येथील मैत्रीपार्कमधील लतिफ शेख (21) याने ओळख वाढविली. याच ओळखीतून त्याने जानेवारी महिन्यात या तरुणीला छोटा काश्मिर दाखविण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले. शेखवर विश्‍वास ठेऊन ही तरुणी त्याच्यासोबत गेली असता त्याने तिला गुंगी आणणारी गोळी खायला देऊन येथील जंगलात नेले. तेथेच तिच्यावर बलात्कार केला आणि याची वाच्यता करु नकोस असे धमकावले. आपल्यासोबत घडलेल्या या प्रकारामुळे तरुणी चांगलीच घाबरली होती. तिने याबाबत कोणालाही काहीच सांगितले नाही. 

गेल्या काही दिवसांपासून तरुणीच्या वारंवार पोटात दुखत असल्याने कुटुंबियांनी तिला उपचारांसाठी डॉक्टरांकडे नेले असता ती गर्भवती असल्याचे उघड झाले. त्यानंतर या तरुणीने आपल्यासोबत घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. कुटुंबीयांनी मुलीला सोबत घेऊन आरे पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तरुणीच्या फिर्यादीवरुन बलात्काराचा गुन्हा दाखल करुन आरोपी शेख याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.