Mon, Jun 17, 2019 21:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › व्हिडीओ व्हायरलची धमकी देत लोटले वेश्याव्यवसायात

व्हिडीओ व्हायरलची धमकी देत लोटले वेश्याव्यवसायात

Published On: Mar 14 2018 1:19AM | Last Updated: Mar 14 2018 1:19AMमुंबई : प्रतिनिधी

नोकरीच्या आमिषाने एका 24 वर्षीय तरुणीला एका खोलीमध्ये बोलावून तिला गुंगीचे औषध पाजत एका नराधमाने तिच्यावर बलात्कार केला. या बलात्काराचा व्हिडीओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी देत या नराधमाने तिला वेश्याव्यवसायात ढकलल्याचा धक्कादायक प्रकार वडाळ्यामध्ये उघडकीस आला आहे. या पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करुन अ‍ॅन्टॉपहील पोलीस तपास करत आहेत.

वडाळा पूर्व परिसरात 24 वर्षीय पीडित तरुणी बहिणीच्या कुटूंबासोबत राहते. नोकरीच्या शोधात असलेल्या या पीडितेला ऑक्टोबर 2017 मध्ये तिच्या सख्ख्या बहिणीने ओळखीच्या तरबेज शेख (30) या तरुणाकडे नेले. नोकरीबाबत बोलण्याच्या बहाण्याने तरबेजने दोघींनाही एका खोलीत नेले. तेथे तरबेजने दोघींना कोल्ड्रींक दिले. कोल्ड्रींक पिताच पीडित तरुणी बेशुद्ध पडली. त्यानंतर तरबेजने तिच्यावर बलात्कार करुन त्याचा एक व्हिडीओ काढला. हा सर्वप्रकार तिच्या बहिणीसमोर सुरू होता. शुद्धीवर आल्यानंतर तरुणीने आपल्यासोबत काही तरी अघटीत घडल्याचे लक्षात आल्याने तिने तरबेज आणि बहिणीकडे याबाबत विचारणा केली.

तरबेज याने बलात्कार केल्याचे कबूल करत याची एक व्हिडीओ क्‍लिप काढल्याचे तिला सांगितले. आपल्यासोबत घडलेल्या या घटनेने तरुणी घाबरली होती. याचाच फायदा उठवत तरबेजने वेळोवेळी व्हिडीओ क्‍लिप व्हायरल करण्याची धमकी देत, येथील एका लॉजवर नेत तिच्यावर बलात्कार करण्यास सुरूवात केली. महिनाभर तरबेजने बलात्कार केल्यानंतर तो या तरुणीला लॉजवर नेऊन अन्य तरुणांसोबत शरिरसंबंध ठेवण्यास भाग पाडू लागला. तरुणीने याला विरोध केला असता तिची बहीण आणि तरबेज तिला बलात्काराची व्हिडीओ क्‍लीप व्हायरल करण्याची धमकी देऊ लागले. त्यामुळे निमुटपणे ती हे अत्याचार सहन करत होती.गेले चार महिने सुरू असलेले अत्याचार सहन न झाल्याने 4 फेब्रुवारीला तरुणीने लॉजवर जाण्यास विरोध करत ती आपल्या निर्णयावर ठाम राहिली. यावरुन तिचे बहिणीसोबत कडाक्याचे भांडण झाले. हा वाद बहिणीच्या नवर्‍यापर्यंत पोहोचल्यानंतर तरुणीने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला.

पत्नीचे प्रताप ऐकून संतापलेल्या पतीने तिची चांगलीच कानउघडणी केली. याच रागातून पीडित तरुणीची बहिण घर सोडून निघून गेली. दरम्यान, 21 फेबु्रवारीला तरुणीचा बलात्काराचा व्हिडीओ व्हायरल झाल्याची माहिती बहिणीच्या पतीला समजली. त्यांच्याकडून ही धक्कादायक बाब समजताच तरुणीने पोलिसांत धाव घेतली.