Mon, Jun 24, 2019 20:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बलात्काराची धमकी देणार्‍यास अटक

बलात्काराची धमकी देणार्‍यास अटक

Published On: Jul 06 2018 1:33AM | Last Updated: Jul 06 2018 12:48AMमुंबई : प्रतिनिधी

ट्विटरच्या माध्यमातून काँग्रेस पार्टीच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देऊन सर्वत्र खळबळ उडवून देणार्‍या गिरीश महेश्‍वरी या 36 वर्षांच्या आरोपीस गोरेगाव पोलिसांच्या एका विशेष पथकाने अहमदाबाद शहरातून अटक केली. चौकशीत त्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली असली तरी त्यामागे त्याचा उद्देश काय होता, त्याला अशा प्रकारे धमकी देण्यास कोणी प्रवृत्त केले होते का याचा आता पोलीस तपास करीत आहेत. 

दरम्यान अटकेनंतर गुरुवारी दुपारी त्याला दिडोंशीतील विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रियांका चतुर्वेदी या काँग्रेस प्रवक्त्या असून त्यांचे ट्विटरवर एक अधिकृत अकाऊंट आहे. काही दिवसांपूर्वी तुमच्या मुलीवर मला बलात्कार करायचा आहे, तिला पाठवून दे असा संदेश एका अज्ञात व्यक्तीने पाठविला होता. ट्विटरवरुन मुलीविषयी आलेल्या या संदेशवजा धमकीने त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. धमकी देणार्‍या व्यक्तीचे ट्विटरवर एक अकाऊंट असून गिरीश 1605 या नावाने या अकाऊंटवर जय श्रीराम असे लिहण्यात आले होते. 

या घटनेनंतर प्रियांका चतुर्वेदी  यांनी मुंबई पोलिसांच्या ट्विटरवर लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर मंगळवारी गोरेगाव पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध विनयभंगासह पोस्को कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता, त्यानंतर त्याला गुजरातमधून ताब्यात घेण्यात आले.