Thu, Jun 27, 2019 17:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भिवंडी हादरली!

भिवंडी हादरली!

Published On: May 20 2018 1:51AM | Last Updated: May 20 2018 1:50AMभिवंडी : वार्ताहर 

शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याच्या घटनांनी भिवंडी हादरून गेली असून, आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे. फातमानगर येथे बापानेच 13 वर्षीय मुलीवर एक महिन्यापासून अत्याचार केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला. शकील अहमद अन्सारी (41) या नराधम बापाने त्याच्या पोटच्या 13 वर्षीय मुलीवर गेल्या महिनाभरापासून अत्याचार केल्याचे उघडकीस  आले आहे. त्याचे पत्नीशी भांडण झाल्याने ती महिनाभरापासून गैबीनगर येथे माहेरी राहत आहे.

तेव्हापासून त्याने मुलीवर अत्याचार सुरू केला होता. रोजच्या अत्याचाराला कंटाळून तिने आईकडे येऊन वडिलांच्या अत्याचाराची माहिती दिली. त्यामुळे आईने तत्काळ पोलीस ठाणे गाठून पतीच्या क्रूरकर्माची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन एपीआय संतोष बोराटे यांनी नराधम बापाला ताब्यात घेऊन गजाआड केले आहे.  

दुसर्‍या घटनेत गायत्रीनगर येथील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला एका तरुणाने लग्नाचे आमीष दाखवून हाजीमलंग येथे लॉजवर तिच्यावर बलात्कार केला. नसीम सतवर अन्सारी (27, रा.नदीया पार) या तरुणाने शेजारच्या गायत्रीनगर मोहल्ल्यातील 15 वर्षीय मुलीला लग्नाचे अमिष दाखवून हाजीमलंग येथील लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी पोलीस उप निरीक्षक रोहन गोंजारी यांनी नसीमला अटक केली आहे. या बलात्कार्‍यांना शनिवारी भिवंडी न्यायालयात हजर केले असता 21 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.