Wed, May 22, 2019 14:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नोकरीच्या आमिषाने पवईत विवाहितेवर बलात्कार

नोकरीच्या आमिषाने पवईत विवाहितेवर बलात्कार

Published On: May 04 2018 1:49AM | Last Updated: May 04 2018 1:29AMमुंबई : प्रतिनिधी

नोकरीचे आमिष दाखवून एका विवाहीत महिलेवर बलात्कार झाल्याची घटना पवई परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी बलात्कारासह जिवे मारण्याची धमकी आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच दिनेश पांडुरंग पवार या तरुणाला त्याच्या अंधेरीतील राहत्या घरातून पवई पोलिसांनी अटक केली. दिनेशने पिडीत महिलेला शारीरिक संबंध ठेवले नाहीतर तिच्या पतीवर जिवघेणा हल्ला, पाच वर्षांच्या मुलीचे अपहरण तसेच तिला एचआयव्हीबाधित इंजेक्शन देण्याची धमकी देऊन तिचे अश्‍लील फोटो तिच्याच मैत्रीणीच्या व्हॉटअपवर व्हायरल केल्याची धक्कादायक माहिती तपासात उघडकीस आली आहे. याच गुन्ह्यांत त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याचे एका अधिकार्‍याने बोलताना सांगितले.

अंधेरीतील एमआयडीसी परिसरात दिनेश पवार हा राहतो. तीन वर्षांपूर्वी त्याची पिडीत महिलेशी ओळख झाली होती. ही महिला पवई येथे तिच्या पतीसह पाच वर्षांच्या मुलीसोबत राहते. पती मनपामध्ये नोकरीस आहे तर तिलाही काम करण्याची इच्छा होती. याबाबत तिने तिच्या एका मैत्रिणीला नोकरीविषयी सांगितले होते. तिने तिची दिनेश पवारशी ओळख करुन केली होती. दिनेशने तिच्याशी जवळीक निर्माण करुन तिला नोकरी देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर ते दोघेही नोकरीनिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी भेटत होते.

दोन वर्षांपूर्वी त्याने तिला जेवणाची ऑफर देत पवईतील एका हॉटेलमध्ये बोलाविले. यावेळी ही महिला तिच्या पाच वर्षांच्या मुलीसोबत तिथे गेली होती. तेथून ते एका लॉजमध्ये गेले आणि तिथेच त्याने तिच्यावर बलात्कार केला होता. हा प्रकार कोणालाही सांगू नकोस नाहीतर नोकरी मिळवून देणार नाही असे त्याने तिला सांगितले होते. यावेळी तिचे काही अश्‍लील फोटो आणि व्हिडीओ त्याने बनविले होते. या घटनेनंतर तिने तिच्या पतीला ही माहिती सांगून पवई पोलिसांत दिनेश पवारविरुद्ध तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला  बलात्कारासह जिवे मारण्याची धमकी देणे आदि कलमांतर्गत बुधवारी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या 8 मेपर्यंत पोलीस कोठडीत आहे. 

दोन वर्ष उलटूनही त्याने तिला नोकरी मिळवून दिली नाही. तसेच सतत शारीरिक व मानसिक शोषण करुन तिला तो त्रास देत होता. त्यामुळे तिने त्याच्याशी असलेले सर्व संबंध तोडून टाकले होते. डिसेंबर 2017 रोजी त्याने तिची माफी मागून तिच्याशी पुन्हा संबंध ठेवण्याची विनंती केली. तिने नकार देताच त्याने तिला धमक्या देण्यास सुरुवात केली. तिच्या पतीला त्यांच्यातील संबंधाची माहिती उघड करण्याची, त्याच्यावर जिवघेणा हल्ला करण्याची, मुलीचे अपहरण आणि तिला एचआयव्ही इंजेक्शन देण्याची धमकी देऊ लागला. ही धमकी दाखवून त्याने तिच्यावर पुन्हा बलात्कार केला होता. काही दिवसांपूर्वी त्याने तिच्या एका मैत्रिणीला व्हॉटअपवर तिचा एक अश्‍लील व्हिडीओ पाठविला होता. हा व्हिडीओ पाहून तिच्या मैत्रिणीला धक्काच बसला होता. तिने तिला हा प्रकार सांगून पोलिसांत तक्रार करण्याची सूचना केल्यानंतर सदर विवाहितेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

Tags : Mumbai, Rape, married, women