Sun, Mar 24, 2019 08:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नेतीवलीत गतिमंद तरुणीवर अत्याचार

नेतीवलीत गतिमंद तरुणीवर अत्याचार

Published On: Jan 28 2018 1:33AM | Last Updated: Jan 28 2018 12:18AMडोंबिवली : वार्ताहर

मानवतेला काळीमा फासणारी घटना नेतीवलीत घडल्याचे समोर आले आहे. शेजारी राहणार्‍या 20 वर्षीय गतिमंद तरुणीवर 35 वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याण पूर्वेत घडला आहे. याप्रकरणी पीडित तरूणीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून नराधमावर कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. गणेश गोसावी असे या नराधमाचे नाव आहे.   

कल्याण-शिळ मार्गावर असलेल्या नेतीवली परिसरात गतिमंद तरूणी आपल्या माता-पित्यासह राहते. गुरुवारी दुपारच्या सुमारास या तरुणीचे आई-वडील कामानिमित्ताने बाहेर गेले होते. यावेळी ही तरुणी घरात एकटीच होती. याच संधीचा फायदा घेत नराधम गणेश तिच्या घरी गेला आणि काही बहाण्याने तिला स्वतःच्या घरी घेऊन आला. त्यानंतर गतीमंदपणाचा फायदा घेत मारहाण करून तिच्यावर बळजबरी केली. घडलेला प्रकार कुणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकीही दिली. यामुळे पीडित तरुणी भयभीत झाली होती. 

आई-वडील रात्रीच्या सुमारास घरी आल्यानंतर तिने स्वतःवर बेतलेला प्रसंग माता-पित्यासमोर कथन केला. यामुळे धक्का बसलेल्या माता-पित्याने पीडित तरुणीसह पोलीस ठाण्यात धाव घेतली. यावर पोलिसांनी नराधम गणेशविरोधात 376 (2), (एल), 323, 506 कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. यानंतर काही तासातच पोलिसांनी नराधमाला बेड्या ठोकल्या. दरम्यान, नराधमाला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 30 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणी अधिक तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. राजपूत करीत आहेत.