Sun, Mar 24, 2019 04:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नारळपाण्यातून गुंगीचे औषध पाजून बलात्कार

नारळपाण्यातून गुंगीचे औषध पाजून बलात्कार

Published On: Jun 02 2018 2:02AM | Last Updated: Jun 02 2018 1:31AMभिवंडी : वार्ताहर

शहरातील शास्त्रीनगर येथील एका 23 वर्षीय नराधमाने अल्पवयीन मुलीला नारळ पाण्यातून गुंगीचे औषध पाजून तिच्या राहत्या घरातच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून भिवंडी शहर पोलीस ठाण्यात बलात्कार व बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरीफ दर्गाही शेख (रा.आसबीबी) असे गुन्हा दाखल झालेल्या नराधमाचे नाव असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलीची एक वर्षापूर्वी नराधम शरीफशी ओळख झाली होती. त्यानंतर ओळखीचा फायदा घेत तिच्या घरी ये-जा करून त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तेव्हापासून पीडितेच्या घरी कोणी नसताना वेळोवेळी नराधम नारळ पाणी घेऊन येत असे आणि त्यामध्ये गुंगीचे औषध पाजून तिला बेशुद्ध करून तिच्यावर बलात्कार करीत होता.

त्यानंतर तिचे आईवडील अजमेरहून दर्शन करून घरी परतल्यानंतर तिने हा प्रकार आपल्या आईला सांगताच तिला धक्काच बसला. पीडितेच्या आईने जाब विचारण्यासाठी नराधम शरीफचे घर गाठले. मात्र त्यावेळी समाजात बदनामी नको म्हणून दोन्ही कुटुंबांकडून तोडगा काढून लग्न करून दोन वर्षांनी सासरी नेण्याचे मान्य केले होते. परंतु नराधम गुपचूपपणे दुसर्‍या मुलीशी लग्न करणार असल्याची कुणकूण पीडितेला लागल्याने ती सासरी जाऊन राहू लागली.

मात्र दोन महिन्यांपासून नराधम तिला सोडून फरार झाला आहे. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे पीडितेला समजल्यावर तिने शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तिच्यावर गुदरलेला प्रसंग महिला पोलीस अधिकार्‍यांसमोर कथन केला. यावर पोलिसांनी नराधम शरीफवर बलात्कार व बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी राऊत करीत आहेत.