Sat, Aug 24, 2019 19:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › युतीला ४२ पेक्षा जास्त जागा : दानवे

युतीला ४२ पेक्षा जास्त जागा : दानवे

Published On: May 21 2019 1:30AM | Last Updated: May 21 2019 1:28AM
मुंबई: खास प्रतिनीधी

भाजप-शिवसेना युतीला महाराष्ट्रात 42 पेक्षा जास्त जागा मिळतील आणि देशात 300 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवून भाजपलाच बहुमत मिळेल, असा दावा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला आहे.

देशाचा पंतप्रधान होण्याचे स्वप्न अनेकांनी पाहिले असून, त्यासाठी कुणी हत्तीवर, तर कुणी सायकलवर स्वार होऊन निघाले आहेत. मात्र, जनता अजिबात भरकटलेली नाही, महाराष्ट्रातल्या जाहीर सभांमधून लोकांचा उत्साह दिसत होता, असे दानवे म्हणाले. महाराष्ट्रात युतीला 42 पेक्षा जास्तच पण कमी जागा मिळणार नाहीत, आणि लोकसभेतही भाजपचे 300 पेक्षा अधिक खासदार असतील, असाही विश्‍वास दानवे यांनी व्यक्त केला. आता भाजप आणि शिवसेना यांच्यात छोटा भाऊ, मोठा भाऊ असा काहीही प्रकार राहिलेला नाही, आमची मने पूर्णपणे जुळलेली आहेत, येत्या विधानसभेच्या निवडणुकीतदेखील हे पुन्हा एकदा दिसेल, असे दानवे म्हणाले.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 22, शिवसेनेला 18 अशा युतीला 42 जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रवादीचे चार तर काँग्रेसचे केवळ दोन खासदार निवडून आले होते. यावेळीही आतापर्यंतच्या राजकीय अभ्यासानुसार राष्ट्रवादी काँग्रेस 6 आणि 4 जागांच्यावर गेलेली नाही आणि काँग्रेस-राष्ट्रवादी मिळून 5 जागांवर जाणार नाहीत, असाही दावा दानवे यांनी केला.