Mon, Mar 25, 2019 02:50
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विधवेकडून पाच लाखांची खंडणी घेणारा भाजपचा पदाधिकारी गजाआड

विधवेकडून पाच लाखांची खंडणी घेणारा भाजपचा पदाधिकारी गजाआड

Published On: May 18 2018 1:43AM | Last Updated: May 18 2018 1:16AMठाणे : खास प्रतिनिधी

एका विधवा महिलेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत बिल्डरकडून वादग्रस्त घराचा ताबा मिळवून देण्यासाठी पाच लाख रुपयांची खंडणी उकळणार्‍या मीरा-भाईंदरमधील भारतीय जनता पार्टीचा नयानगर मंडळाचा अध्यक्ष मुनाफ पटेल याला बुधवारी पोलिसांनी अटक केली.

मीरा-भाईंदर महापालिका हद्दीतील नयानगरमध्ये राहणारी शाहीन नासीर खान (56) ही विधवा महिला राहते. तिच्या तक्रारीवरून आरोपी मुनाफ पटेल याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. तक्रारदार खान यांनी त्रिवेदी नावाच्या बिल्डरकडे सदनिका खरेदी केलेली आहे. बिल्डरने अद्याप सदनिका खान यांना ताब्यात दिलेली नाही. त्यावरून दोघांमध्ये न्यायालयीन लढाई सुरू आहे. हा वाद मिटवून बिल्डरकडून घर मिळवून देण्यासाठी आरोपी पटेल याने शाहीन खान यांच्याकडे सात लाखांची मागणी केली. 

तुम्ही एवढी रक्कम दिली तरच घर मिळेल अन्यथा सर्व पैसे विसरून जा? अशी धमकी देत पाच लाख रुपये घेतले देखील. बिल्डरकडून सदनिका त्या महिलेला मिळावी, यासाठी आरोपी पोलिसांकडे तक्रार अर्ज करून त्याच्यावर दबाव टाकत होता. दुसरीकडे विधवा महिलेकडे सात लाखांची मागणी करीत होता. याप्रकरणी खान यांनी नयानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीला बुधवारी अटक करण्यात आली. त्यानंतर आरोपीने फिर्यादीची सर्व रक्कम परत केली, त्यामुळे पोलीस कोठडी मिळाली नाही. त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक  बालाजी पांढरे यांनी दिली.