Tue, May 21, 2019 00:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › खंडणीच्या वादातून युवा अध्यक्षाची गोळ्या झाडून हत्या

खंडणीच्या वादातून युवा अध्यक्षाची गोळ्या झाडून हत्या

Published On: Aug 29 2018 1:43AM | Last Updated: Aug 29 2018 1:05AMमुंबई : प्रतिनिधी

खंडणीच्या वादातून झारखंड विकास मोर्चाचे युवा अध्यक्ष रणजीतकुमार सिंग यांची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर मुंबईत पळून आलेल्या गॅग ऑफ वासेपूरच्या दोन शूटरला अंधेरी येथून पोलिसांनी अटक केली. झारखंड पोलिसांनी ओशिवरा पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. अटकेनंतर दोन्ही शूटरला पुढील चौकशीसाठी झारखंड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

औरंगजेब मोहम्मद शब्बीर शेख आणि शमशाद अख्तर नौशाद अख्तर खान ऊर्फ विकी अशी या दोन शूटर्सची नावे आहेत. रणजीतकुमार हे झारखंडच्या धनबादच्या झारखंड विकास मोर्चाचे युवा अध्यक्ष आहे. या परिसरात ते प्रचंड लोकप्रिय असून त्यांचा कोळसाचा वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे काही महिन्यांपूर्वी गॅग ऑफ वासेपूरच्या म्होरक्याने खंडणीची मागणी केली होती. प्रतिटन पाच रुपयांप्रमाणे कमिशनची रक्कम पाठविली नाही तर त्यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. मात्र, रणजीतकुमार यांनी खंडणीची रक्कम देण्यास स्पष्टपणे नकार दिला होता. 24 ऑगस्टला ते त्यांच्या कारमधून धनबाद येथील घरातून कामासाठी जात होते. यावेळी केसुंदा रेल्वे स्थानकाजवळ दबा धरून बसलेल्या दोन शूटरने त्यांच्यावर गोळीबार केला. चार गोळ्या लागल्याने रणजीतकुमार हे गंभीरररीत्या जखमी झाले होते, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या हत्येनंतर धनबाद परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. या हत्येची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत मारेकर्‍यांच्या अटकेसाठी एका विशेष पथकाची नियुक्ती केली होती. पळून गेलेल्या शूटरचा शोध सुरू असताना ते मुंबईत पळून गेल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे झारखंड पोलिसांनी त्याला मुंबईत अटक केली.