Tue, Apr 23, 2019 20:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › केडीएमसीत राणेसमर्थकाला महापौरपद!

केडीएमसीत राणेसमर्थकाला महापौरपद!

Published On: May 08 2018 1:56AM | Last Updated: May 08 2018 1:36AMडोंबिवली : वार्ताहर

कल्याण-डोंबिवलीत महापौरपद निवडणुकीचे तीव्र पडसाद उमटत असून शिवसेनेला मोठा तडा जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिवसेनेमध्ये महापौरपदासाठी जोरदार रस्सीखेच होती. महिला नगरसेविकांची अनेक नावे चर्चेत होती. परंतु या निवडणुकीत पक्षनेतृत्वाने काँग्रेसमधून सेनेत आलेल्या नारायण राणेसमर्थक स्वीकृत नगरसेवक विश्वनाथ राणे यांच्या पत्नी विनीता राणे यांच्या गळ्यात महापौर पदाची माळ टाकली आणि गेले दोन दिवस सेनेत सुरू असलेली धुसफूस सोमवारी उफाळून आली. काही स्थानिक पदाधिकार्‍यांनी राजीनामा देण्याची भूमिका बोलून दाखवली.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री उशिरा सर्व नाराज शिवसैनिकांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन कैफियत मांडली. न्याय्य मागण्यांसाठी व महापौरपद अनेक वर्षे शिवसेनेसाठी झटून संघटना वाढीसाठी रात्रीचा दिवस करणार्‍या कोणालाही द्या, अशी मागणी करण्यासाठी ते ठाण्यास रवाना झाल्याचे समजते. शिवसैनिकांना विश्वासात न घेता जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी एकतर्फी अभिनव बँकेच्या निवडाणुकीत समर्थ पॅनेलला पाठिंबा जाहीर केला. मात्र सोमवारी जाहीर झालेल्या निकालात या पॅनेलचा पूर्ण धुव्वा उडाला. या पार्श्वभूमीवर शिवसेनेची नाहक बदनामी झाली असाही नाराज शिवसैनिकांचा सूर आहे. त्यामुळे 9 तारखेला होणारी महापौरपदाची निवडणूक शिवसेनेला किती महाग पडणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

कल्याण, डोंबिवली, कल्याण पूर्व मांडा-टिटवाळा, कल्याण ग्रामीण, डोंबिवली पूर्व-पश्चिम अशा सर्वच भागातील शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक, महिला आघाडी युवासेना पदाधिकार्‍यांनी प्रचंड संताप व नाराजी व्यक्त करत स्थानिक पदाधिकार्‍यांकडे राजीनामे देण्याची तयारी केली. काहींनी तर राजीनामे दिल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्या.