Sun, Sep 23, 2018 22:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुख्यमंत्रीभेटीत राणेंचा राज्यसभा प्रवेश नक्‍की?

मुख्यमंत्रीभेटीत राणेंचा राज्यसभा प्रवेश नक्‍की?

Published On: Mar 07 2018 2:08AM | Last Updated: Mar 07 2018 1:57AMमुंबई : उदय तानपाठक

नारायण राणे यांचे राज्यसभेेवर जाणे हे जवळपास नक्‍की झाले असून, येत्या एक-दोन दिवसात त्याची घोषणा स्वतः राणे आणि मुख्यमंत्री एकत्रितरीत्या करतील, अशी शक्यता आहे. दरम्यान, आपण अजून निर्णय घेतलेला नाही. मात्र, येत्या दोन दिवसांत निर्णय घेऊन तो मुख्यमंत्र्यांना कळवू, असे राणे यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितले.

नारायण राणे यांनी मंत्रिपदाची मागणी केली असताना, आता भाजपने त्यांना राज्यसभेची जागा देऊ केली आहे. भाजपची ऑफर ते स्वीकारणार की नाही, याबद्दल प्रसारमाध्यमांतून चर्चा सुरू असताना, मंगळवारी राणे यांनी विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सुमारे अर्ध्या तासाच्या चर्चेनंतर वार्ताहरांशी बोलताना, आपण आपले काय म्हणणे आहे ते मुख्यमंत्र्यांना सांगितले असून, येत्या एक-दोन दिवसात अंतिम निर्णय जाहीर करू, असे राणे म्हणाले.

राणे यांची महाराष्ट्राला अधिक गरज असून, त्यांनी राज्यातच राहावे, अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा असल्याचे ट्विट राणे यांचे चिरंजीव आमदार नितेश राणे यांनी केले होते. आपण निर्णय घेताना त्यांचे म्हणणेही विचारात घेऊ, असे राणे म्हणाले. दरम्यान, भाजपाध्यक्ष अमित शहा आज रात्री उशिरा मुंबईत येत असून, आज वा उद्या मुख्यमंत्री फडणवीस हे त्यांना भेटणार आहेत. मात्र, आपण शहा यांना आता भेटणार नाही, असे राणे यांनी स्पष्ट केले.