Tue, Mar 19, 2019 05:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तुम्ही तिला प्रपोज करा,  ती नाही म्हणाली, तर तिला पळवून आणणार आणि  तुम्हाला देणार...

तुम्ही तिला प्रपोज करा,  ती नाही म्हणाली, तर तिला पळवून आणणार आणि  तुम्हाला देणार...

Published On: Sep 05 2018 7:44AM | Last Updated: Sep 05 2018 2:41AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

मला कोणत्याही कामासाठी भेटू शकता. एखाद्या मुलीला प्रपोज केले आणि ती नाही म्हणाली, तर तिला पळवून आणणार आणि  तुम्हाला देणार, अशी संतापजनक मुक्ताफळे भाजपचे घाटकोपर येथील आमदार राम कदम यांनी सोमवारी दहीहंडी उत्सवात उधळली. या वक्तव्याची क्‍लिप मंगळवारी व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. राम कदम यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी हा राम नसून मुलींचे हरण करणारा रावण असल्याचे टीकास्त्र सोडले. 

घाटकोपरमध्ये गोविंदासमोर आपली कार्यशैली मोठ्या कौतुकाने सांगताना राम कदम म्हणाले, ‘तुम्ही मला कोणत्याही कामासाठी फोन करू शकता. साहेब, मी तिला प्रपोज केले, पण ती मला नाही म्हणते. मला मदत करा, चुकीचे आहे, पण शंभर टक्के मदत करणार. तुमच्या आईवडिलांना घेऊन या. जर आईवडील म्हणाले, मुलगी पसंत आहे तर तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार’. 

या वक्‍तव्यातून राम कदम यांचा रावणी चेहराच समोर आल्याचे नवाब मलिक म्हणाले. राम कदम मुलींचे हरण करण्याची भाषा बोलतात. कुणाला कुठलीही मुलगी पसंत पडली तर त्या मुलीचे हरण करणार अशी भाषा वापरतात. आजपासून राम कदम यांचे नामकरण रावण झालेले असून यापुढे ते रावण कदम म्हणून ओळखले जातील, अशी टीकाही त्यांनी केली. यापुढे महाराष्ट्रात मुलीला पळवून देण्याचा प्रकार घडल्यास पहिला गुन्हा राम कदम यांच्यावर दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी केली. 

राम कदम यांनी मात्र विरोधकांनी राजकीय हेतूने क्‍लिप व्हायरल केल्याचा आरोप केला. या व्हिडीओमधील मागचा आणि पुढचा भाग काढून टाकण्यात आला आहे, असा तक्रारीचा सूर त्यांनी लावला.