Tue, Jul 23, 2019 06:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राम नाईक यांच्या मुंबईतील कार्यालयात चोरीचा प्रयत्न 

राम नाईक यांच्या मुंबईतील कार्यालयात चोरीचा प्रयत्न 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

जोगेश्वरी:प्रतिनिधी

उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या गोरेगाव पूर्व जय प्रकाश नगर येथील कार्यालयात गुरुवारी रात्री साड़ेअकराच्या सुमारास चोरीचा प्रयत्न झाला. मात्र जागरूक रहिवाशांनी सापळा रचून एका चोरट्याला अटक केली. दोघे फरार झाले आहेत. हे चोरटे झारखंडमधील आहेत.  

राम नाईक याचे गोरेगावमधील जयप्रकाश नगर येथे शिवस्मृती इमारतीत दुसर्‍या माळ्यावर कार्यालय आहे. ते दररोज सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत सुरू असते. गुरुवारी रात्री कार्यालय बंद झाल्यावर कार्यालयाचे लॅच कडी चोरीच्या उद्देशाने तोडली. कडी तोडताना आवाज आल्याने शेजार्‍यांनी बाहेर बघितले असता, तीन चोर चोरी करत असल्याचे आढळून आले. शेजार्‍यांनी तत्काळ पहिल्या माळ्यावर राहणार्‍या रहिवाशांना फोनवर संपर्क करून याची कल्पना दिली. रहिवाशांनी सापळा रचून एका चोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. अन्य दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. चोराला धाडसाने पकडून ठेवणार्‍या रहिवाशांचे राम नाईक यांनी आभार मानले आहेत. वनराई पोलिसांनी चोरी करण्यासाठी आणलेले साहित्य, कटावणी आणि स्क्रू ड्रायव्हर जप्त केले आहेत. 

तिसरी घरफोडी

नव्वदच्या दशकात नाईक यांचे नवी दिल्ली येथील खासदार म्हणून मिळालेले निवासस्थान फोडले गेले होते. त्यावेळी  नाईक मुंबईत आले होते. चोरट्यांना कोणताही ऐवज न मिळाल्यामुळे त्यांनी सर्व कागदपत्रे विसकटली होती. 

2002 साली राम नाईक पेट्रोलियम मंत्री असताना दिवाळीत त्यांचे कुटुंब सर्वजण दिल्लीला गेले होते. त्यावेळी ज्याठिकाणी आता कार्यालय आहे, त्या ठिकाणी निवासस्थान होते. त्यावेळी कॅमेरा आणि स्मृतिचिन्ह अशा गोष्टी वगळता चोरांना काही मिळाले नव्हते. 

 

Tags : mumbai, mumbai news, Jogeshwari crime, Ram Naik, Mumbai office, Stolen,


  •