Thu, Apr 18, 2019 16:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राम मंदिर वही बनाएंगे : भागवत

राम मंदिर वही बनाएंगे : भागवत

Published On: Apr 16 2018 8:14AM | Last Updated: Apr 16 2018 8:14AMडहाणू : प्रतिनिधी

देशाला अनेक संत, महंत, कीर्तनकार, भगत यांच्या धार्मिक नेतृत्वाची परंपरा लाभली आहे. समाजजागृतीसाठी कार्य करण्याची परंपरा आपण जोपासली पाहिजे. गाय, तुळस, जननी व जन्मभूमी आपली माता आहे. हिंदू संस्कृतीचे सर्व अनुयायी हे आपले बंधू असून राम मंदिर होणारच, असे सांगून सुमारे दोन हजार वर्षांत कधीही शरणागती पत्करली नाही, तो समाज म्हणजे आदिवासी समाज असल्याचे मत डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्‍त केले.

तलासरी येथील जनजाती प्रकल्पाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा समारोप सोहळा रविवारी(दि. 15) डहाणू आसवे येथे पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

आपण हिंदू आहोत हे सांगण्यासाठी लोकांना गोळा करावे लागते, याबद्दल त्यांनी चिंता व्यक्‍त करून समाजाच्या नैतिक तसेच आध्यात्मिक जीवनमूल्यांचे संरक्षण करून जाती, भाषा, प्रांत, भेद नष्ट करण्याचा उपदेश केला. 

मेकॉलेने ब्रिटिशकाळात आपल्यात फूट पाडली. देशातील तीन महत्त्वाची मंदिरे परकीय मुस्लिम आक्रमणकार्‍यांनी पाडली. त्यामुळे राम मंदिर होणारच, असे त्यांनी ठणकावले. आदिवासी समाजाला धर्मापासून तोडू पाहणार्‍या फुटीरतावादी शक्‍तींना आळा घालण्यासाठी प्रयत्न होत आहेत. त्यापासून वेळीच सावध व्हावे, त्यांच्यासाठी एक तृतीयांश वेळ आणि धन खर्च करावे, असे आवाहन त्यांनी केले. बुद्धी, मन व शरीराने सुदृढ असलेला भारतीय समाज जगासाठी मार्गदर्शक ठरेल, असे सूतोवाच त्यांनी केले.

यावेळी स्वामी रघुनाथ महाराज, वारकरी संप्रदायाचे हरिश्‍चंद्र कुवरा महाराज व वसंत हिलीम महाराज यांनी उपस्थितांना संबोधित करताना हिंदुत्व ही जीवन जगण्याची प्रणाली असल्याचे सांगितले.
स्वामी सदानंद महाराज, प्रशांत हरताळकर, राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालघरचे पालकमंत्री विष्णू सवरा, आमदार पास्कल धनारे आदी यावेळी उपस्थित होते.

याप्रसंगी वनजन गाथा पुस्तकाचे लेखक भोये, आदिवासी चित्रकार हरेश्‍वर वनगा आणि वयम संस्थेचे माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक थालकर यांचा डॉ. भागवत यांच्या हस्ते सत्कार करण्यात 
आला.

कार्यक्रमासाठी विश्‍व हिंदू परिषदेचे कोकण प्रांत अध्यक्ष देवकीनंदन जिंदल, पालघर जिल्हा अध्यक्ष राजकुमार नागशेट, वनवासी प्रकल्प अध्यक्ष रतनलाल सिंघानिया, संघाचे जिल्हाप्रमुख गोपीनाथ अंभिरे, व्हीएचपीचे सुशील शाह तसेच संघ व संघ शाखांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तलासरी, डहाणू, जव्हार, मोखाडा, पालघर, वसई, बोईसर, वाडा या तालुक्यांतील हजारो नागरिक कार्यक्रमाला उपस्थित होेते.

मेकॉलेने ब्रिटिशकाळात आपल्यात फूट पाडली. देशातील तीन महत्त्वाची मंदिरे परकीय मुस्लिम आक्रमणकार्‍यांनी पाडली. त्यामुळे राम मंदिर होणारच! 
    - मोहन भागवत, सरसंघचालक     (आरएसएस)

 Tags :mohan bhagawat, ram mandir, ram temple, ayodhya