Tue, Mar 26, 2019 20:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राम कदम यांचे प्रवक्‍तेपद धोक्यात

राम कदम यांचे प्रवक्‍तेपद धोक्यात

Published On: Sep 07 2018 1:28AM | Last Updated: Sep 07 2018 1:28AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

लग्नाला नकार देणार्‍या मुलीला पळवून आणण्याच्या बेताल वक्तव्यामुळे टीकेचे धनी ठरलेले आमदार राम कदम यांनी अखेर राज्यातील माता-भगिनींची माफी मागत या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. बुधवारी रात्री प्रदेश भाजपच्या बड्या नेत्याने राम कदम यांची खरडपट्टी काढत माफी मागण्याची सूचना केल्यानंतर कदम यांनी आपला माफीनामा जाहीर केला. मात्र, विरोधकांचे या माफीनाम्याने समाधान झाले नसून त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली जात आहे. 

दहीहंडी उत्सवात मुली पळवून आणण्याबाबत केलेले राम कदम यांचे वक्तव्य वादग्रस्त ठरले. त्यांच्यावर चोहोबाजूने टीका होत असतानाही त्यांनी केवळ दिलगिरी व्यक्त केल्याने संतापात अधिकच भर पडली होती. मात्र, वाद वाढू लागल्यानंतर भाजपकडून राम कदम यांना तंबी देण्यात आली. वक्तव्यावर गेले दोन दिवस चहूबाजूने टीका होत आहे. पक्षालाही त्याची हानी पोहोचत आहे. त्यामुळे आता अधिक न ताणता माफी मागा अशी सूचना भाजपच्या वजनदार मंत्र्याने राम कदम यांना केली. त्यानंतर कदम यांनी ट्विटरवर माफी जाहीर केली. 

माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून माझ्या राजकीय हितशत्रूंनी जो वाद निर्माण केला, त्यामुळे माता-भगिनींची मते दुखावली. झाल्याप्रकाराबद्दल मी वारंवार दिलगिरी व्यक्त केली. पुन:श्‍च माता-भगिनींचा आदर करीत मी माफी मागत आहे, असे राम कदम यांनी सांगितले. मात्र, त्यांच्या या माफीनाम्यावर विरोधकांचे समाधान झालेले नाही. राम कदम यांनी महिलांचा जो अपमान केला, त्यासाठी माफी मागून चालणार नाही. त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. जोपर्यंत राजीनामा घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांनी स्पष्ट केले. बुलडाण्यातील काँग्रेसचे माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी तर जो कोणी राम कदम यांची जीभ झाटून आणेल त्याला पाच लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे.  

राज्य महिला आयोगाने कदम यांच्या वक्तव्याची दखल घेत त्यांना नोटीस बजावली आहे. येत्या आठ दिवसांत त्यांना खुलासा करण्यास सांगितले आहे. आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांना कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने त्यांच्यावरही नाराजी व्यक्त केली जात होती. अखेर आयोगाने या वक्तव्याची दखल घेत नोटीस जारी केली. दरम्यान राम कदम यांचे प्रवक्तेपदही काढून घेतले जाण्याचे संकेत आहेत. त्यांना सध्या कोणत्याही चॅनलवर न जाता शांत रहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, त्यांचे प्रवक्तेपद काढून घेतले जाणार असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली. 

गोविंदा पथकांचा बहिष्कार 

राम कदम यांच्या विरोधात आता गोविंदाही उभे राहिले आहेत. दहीहंडी पथकांच्या समन्वय समितीने यापुढे कदम यांच्या दहीहंडीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. कदम यांनी राज्यातील माता- भगिनींबद्दल केलेले वक्तव्य निषेधार्ह असल्याचे सांगत त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.