Tue, Apr 23, 2019 05:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › घाटकोपर बनले कदमविरोधी आंदोलनाचे केंद्र

घाटकोपर बनले कदमविरोधी आंदोलनाचे केंद्र

Published On: Sep 06 2018 1:41AM | Last Updated: Sep 06 2018 1:41AMघाटकोपर : वार्ताहर

आमदार राम कदम यांनी दहीहंडी कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याचे संतप्त पडसाद घाटकोपरमध्ये दिवसभर उमटले. शिवसेना- मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करून राम कदम यांना अटक  करावी व त्यांच्यावर  कारवाई करावी अशी  मागणी केली. राम कदम यांनी रक्षाबंधनच्या निमित्ताने वाटलेल्या साड्या रस्त्यावर फेकून देण्यात आल्या. घाटकोपरला कदम यांच्या निवासस्थानासमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर पोलीस ठाण्याला छावणीचे स्वरूप आले होते. 

कदम यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी घाटकोपर पोलीस स्थानकासमोर  राष्ट्रवादी काँग्रेसचे ठिय्या आंदोलन सुरू होते त्याचवेळी शिवसेनेच्या आंदोलनालाही सुरुवात झाली. शिवसेनेचे विभाग प्रमुख राजेंद्र राऊत , विभाग संघटक भारती बावदाने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन  करत शिवसेनेने   राम कदम यांना अटक करण्याची मागणी केली.  महिला आघाडीने जोरदार घोषणा देत  सगळा  परिसर दणाणून सोडला. 

कारवाई न झाल्यास शिवसेनेचे आंदोलन 

राम कदम यांचा मुखवटा लावलेले मडके फोडून शिवसेनेने निषेध केला.  महिलांचा अपमान केला म्हणून कदम यांच्यावर  गुन्हा दाखल करावा व त्यांची  सुरक्षा काढून  घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. याच मागणीचे  निवेदन  त्यांनी  पोलिसांना  दिले.  त्यांनी केलेले विधान हे   महिलांचा अपमान करणारे आहे.  त्याची दखल घेऊन त्यांच्यावर यांच्या कारवाई करावी अथवा शिवसेना आणखी तीव्र आंदोलन करेल  असा इषाराही देण्यात आला.

काँग्रेसचा थाळीनाद 

कदम यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसच्या महिला पदाधिकार्‍यांनी थाळीनाद करून कदम यांचा निषेध केला. पोलीस ठाण्यासमोर हे आंदोलन करण्यात आले.  काँग्रेसचे कार्यकर्ते तेथे पोहोचले तेव्हा त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली.त्यातच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देखील सूर मिळवीत घाटकोपर पोलीस ठाण्याला आंदोलनाची छावणी बनवली. पोलिसांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ठाण्याचा बाहेरच रोखून धरले. या वेळी महिलांनी निषेध नोंदवून  कदम यांच्या प्रतिमेला काळे फासत जोडे मारले.तसेच त्यांच्याविरोधात   गुन्हा नोंदवून त्यांना अटक करावी अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येत पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या  आंदोलन सुरू केले.     

राष्ट्रवादीची धडक 

कदम यांच्या  निवासस्थानासमोर  राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. पोलिसांना याची अगोदरच कुणकुण लागल्याने पेलिसांनी आंदोलकांना रस्त्यातच अडविले. तिथे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. राष्ट्रवादीच्या महिलांनी त्यांच्या
 प्रतिमेला काळे फासत जोडे मारो आंदोलन करण्यात आले.नंतर त्यांनी आपला मोर्चा घाटकोपर पोलीस ठाण्याकडे वळविला व   याप्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी  केली. गुन्हा दाखल होत नाही तेवर ठिय्या आंदोलन मागे घेतले जाणर नसल्याची भूमिका त्यांनी घेतली. 

मनसेकडूनही निषेध 

घाटकोपरच्या विविध चौकात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राम कदम  यांना रावणाच्या रूपात व्यंगचित्रात दाखवून त्यांचा निषेध केला. मनसेचे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी घाटकोपर  बरोबरच वर्षा बंगल्याजवळही असे बॅनर लावले होते.  मनसेने घाटकोपर रेल्वेस्थानकासमोर कदम यांच्या  पुतळ्याला जोडे मारो आंदोलनकेले. कदम यांनी महिलांना रक्षाबंधनानिमित्य  वाटलेल्या साड्या मनसेने  रस्त्यावर फेकून  दिल्या.