मुंबई : विशेष प्रतिनिधी
मुलीने नकार दिला तर तिला पळवून आणू, असे बेताल वक्तव्य करणारे भाजप आमदार राम कदम यांनी आपल्या वक्तव्यावर राज्यातील माता भगिनींची दिलगिरी व्यक्त केली. बिनशर्त माफी मागण्याची व त्यांच्यावर कारवाईची मागणी होत असताना कदम यांनी केवळ दिलगिरी व्यक्त करीत आपली सुटका करुन घेण्याचा प्रयत्न केला.
घाटकोपर येथील दहीहंडी उत्सवात राम कदम यांनी एखाद्या मुलीने जर लग्नाला नकार दिला तर मला फोन करा, तिला पळवून आणतो असे बेताल वक्तव्य केले होते. त्यावरून राज्यभर संतप्त गदारोळ उठताच राम कदम यांनी बुधवारी सायंकाळी सोशल मीडियावर दिलगिरी व्यक्त केली. मात्र, या दिलगिरीने विरोधकांचे समाधान झालेले नाही. आक्रमक झालेल्या विरोधकांनी राज्यभर निदर्शने केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कदम यांच्या घरासमोर निदर्शने करीत राष्ट्रवादी महिलांनी त्यांचा निषेध केला. कदम यांच्या फोटोला काळे फासत आणि चपलांचा मारा करत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. सातार्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना घेराव घालण्यात आला.
पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांचीही गाडी अडविण्यात आली. पंढरपूर, औरंगाबाद, इंदापूर आदी ठिकाणीही जोरदार निदर्शने करण्यात आली. शिवसेनेच्या महिला आघाडीनेही कारवाईची मागणी केली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी तर कदम यांच्यावर कारवाई झाली नाहीतर येणारे अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा दिला आहे.
बोट लावून दाखवा : राजकीय पक्षच नव्हे तर राज्यातील महिलांमध्येही कदम यांच्या वक्तव्यावरुन संताप उसळला आहे. पुण्यातील एका युवतीने तर राम कदम यांना सोशल मीडियावरुन खुले आव्हान दिले आहे. कदम तुम्ही पुण्यात या, किंवा मी मुंबईत येते. मला तुम्ही बोट लावून दाखवा, असे सुनावले आहे. राज्यभर उसळलेल्या संतापामुळे राम कदम अडचणीत आले आहेत.
भाजपकडून कारवाई नाही : राम कदम यांच्यावर सर्व स्तरातून कारवाईची मागणी होत असताना प्रदेश भाजपने मात्र, सावध पवित्रा घेतला आहे. त्यांनी केलेले वक्तव्य तपासण्यासाठी त्यांच्या वक्तव्याची सीडी मागविण्यात आली आहे. कदम यांचे वक्तव्य तपासण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले असले तरी कारवाई करण्याच्या मागणीवर मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.