Wed, Nov 14, 2018 23:50होमपेज › Mumbai-Thane-Raigad ›

राज्यसभेच्या उपसभापतिपदाचे सेनेला गाजर? राऊतांचा इन्कार
 

राज्यसभेच्या उपसभापतिपदाचे सेनेला गाजर? राऊतांचा इन्कार
 

Published On: Apr 05 2018 2:24AM | Last Updated: Apr 05 2018 2:01AMमुंबई : खास प्रतिनीधी

सातत्याने भाजपवर टीकेची झोड उठवणार्‍या शिवसेनेला राज्यसभेचे उपसभापतीपद देऊ केले आहे.  भाजपा सरकारवर अविश्‍वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत असलेल्या चंद्राबाबू नायडू यांची कालच सेनेच्या खासदारांनी भेट घेतली होती. त्यानंतर लगेचच भाजपाकडून ही ऑफर देण्यात आल्याचे समजते. सेनेने ही ऑफर स्वीकारल्यास संजय राऊत यांच्या गळ्यात राज्यसभेच्या उपसभापतिपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. बुधवारी दिवसभर ही चर्चा सुरू होती. मात्र अशी काहीही ऑफर भाजपाकडून आलेली नाही, असा खुलासा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. 

हे पद देऊ केल्याचे आम्हाला माध्यमांमधूनच समजते आहे, अधिकृतपणे भाजपाकडून काहीही कळवण्यात आलेले नाही, असे राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. भाजपाने अशी ऑफर दिली, तर त्यावर काय निर्णय घ्यायचा हे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हेच ठरवतील, असे राऊत यांनी स्पष्ट केले. 

राज्यसभेत शिवसेनेचे संजय राऊत, अनिल देसाई आणि राजकुमार धूत हे तीन खासदार आहेत. भाजपाची ऑफर सेनेने स्वीकारल्यास संजय राऊत हेच ज्येष्ठ  असल्याने त्यांना उपसभापतीपद मिळेल, अशी जोरदार चर्चा आहे. राज्यसभेची सदस्यसंख्या 250 असली, तरी सध्या 245 खासदार नेमण्यात आले आहेत. त्यापैकी 12 खासदार राष्ट्रपती नियुक्त असतात. राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो. त्यामधील एक तृतीयांश सदस्य दर दोन वर्षांनी सेवानिवृत्त होतात.