Wed, Apr 24, 2019 12:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महिला गुप्तहेर रजनी पंडित यांना ७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

महिला गुप्तहेर रजनी पंडित यांना ७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

Published On: Feb 04 2018 2:14AM | Last Updated: Feb 04 2018 2:09AMठाणे : खास प्रतिनिधी

दिल्लीतील टोळीकडून बेकायदेशीरपणे पाच कॉल डिटेल्स रेकॉडर्स अर्थात सीडीआर विकत घेतल्याची कबुली देणार्‍या खासगी गुप्तहेर रजनी शांताराम पंडित यांना शनिवारी ठाणे सत्र न्याायालयाने 7 फेब्रुवारी तर आणखी दोन आरोपींना 8 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. आतापर्यंत सीडीआर घोटाळ्याप्रकरणी सात जणांना अटक झाली असून या टोळीच्या म्होरक्याला पकडण्यासाठी ठाणे पोलिसांचे पथक दिल्लीला रवाना झाले आहे. त्याचबरोबर चार सीडीआर विकत घेणार्‍या विमा कंपन्यांचीही चौकशी केली जात आहे. 

 आरोपी माकेश माधवन पांडीयन (42 रा. वाशी, नवी मुंबई), प्रशांत श्रीपाद पालेकर (49 रा. कोपरखैराणे), जीगर विनोद मकवाना (35 रा. गिरगाव, मुंबई) आणि समरेश ननटून झा उर्फ प्रतीक मोहपाल (32 रा. मिरा गावठाण) या खासगी गुप्तहेरांच्या टोळीला ठाणे गुन्हे शाखेने जेरबंद केल्यानंतर सुप्रसिद्ध खासगी गुप्तहेर रजनी पंडित यांना शुक्रवारी रात्री ठाणे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. त्यानंतर झालेल्या पोलीस तपासात आरोपी पंडित यांनी प्रतीक मोहपाल याच्याकडून प्रत्येकी 12 हजार रुपये मोजून पाच सीडीआर विकत घेतल्याची कुबली दिली. त्या पाच सीडीआरपैकी तीन सीडीआर चुकीचे होते. मात्र एक सीडीआरचा उपयोग लग्नाच्या चौकशीसाठी करण्यात आला तर दुसरा सीडीआरचा उपयोग हा व्यसनाधीन झालेल्या मुलांची माहिती काढण्यासाठी झाल्याचे आरोपीने सांगितले. 

या टोळीचा सूत्रधार दिल्लीतील सौरव साहू असून मुंबईचे क्लिगं मिश्रा, किर्तेश कवी, शितला शर्मा हे तिघे टोळीचे सक्रिय सदस्य आहेत. त्यामुळे प्रमुख गुन्हेगाराला पकडण्यासाठी ठाणे पोलिसांचे पथके दिल्लीला रवाना झाले असून मुंबईतील आरोपीला लवकरच ताब्यात घेतले जाणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. त्याचबरोबर गुन्हे शाखेने गुरुवारी चेंबूर परिसरातून संतोष पंडागळे आणि नवी मुंबईतून प्रशांत सोनावणे या दोघांना अटक केली. हे दोघेही इतर आरोपींकडून कॉल रेकॉर्ड विकत घेत होते. या दोन्हीं आरोपींना ठाणे न्यायालयाने आठ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.