होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवरायांचे प्रेरणापीठ : राजमाता जिजाऊ

शिवरायांचे प्रेरणापीठ : राजमाता जिजाऊ

Published On: Jun 17 2019 3:26PM | Last Updated: Jun 17 2019 3:26PM
श्रीमंत कोकाटे, इतिहास अभ्यासक

यशासाठी प्रयत्नांची गरज असते, हे राजमाता जिजाऊंच्या चरित्रावरून स्पष्ट होते. जिजाऊंचे कार्य हे केवळ चूल आणि घर या परिघापुरते नव्हते, तर स्वराज्य हेच त्यांचे घर होते. स्वराज्यातील सर्व जाती-धर्मांतील मुलांना त्यांनी आपल्या शिवबाप्रमाणे वागविले. त्यांनी कधीही भेदाभेद केला नाही. जिजाऊ समतावादी होत्या. त्यामुळेच सर्व जाती-धर्मांची मुले शिवरायांसाठी प्राणार्पण करण्यासाठी पुढे आली. जिजाऊंच्या चरित्रातून समता आणि बुद्धिप्रामाण्यवाद शिकला पाहिजे.

अराजकतेच्या पार्श्‍वभूमीवर मूर्तिमंत शिवराज्य उभे करणार्‍या राजमाता म्हणजे जिजामाता. विखुरलेल्या देशबांधवांना एकतेच्या सूत्रात गुंफून स्वराज्याचे जनआंदोलन उभे करणार्‍या राजमाता जिजामाता यांचे जीवनचरित्र अत्यंत प्रेरणादायक आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून रयतेचे स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवणार्‍या जिजाऊंचे व्यक्तिमत्त्व म्हणजे धैर्य, शौर्य, प्रचंड आत्मविश्‍वास, इच्छाशक्ती आणि गरिबांप्रती प्रचंड तळमळीने ओतप्रोत भरलेले आहे. राजमाता जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी सिंदखेडराजा (जि. बुलढाणा) येथे इतिहास प्रसिद्ध यादव घराण्यातील लखूजीराजे जाधव या राजघराण्यात झाला. लखूजीराजेंनी आपल्या मुलांबरोबरच मुलीला म्हणजेच जिजाऊला देखील राजनीती, युद्धकलेचे शिक्षण दिले. जिजाऊंनी राजघराण्याचा वृथा अभिमान न बाळगता युद्धकला, राजनीती यामध्ये प्रावीण्य मिळवले. याचा उपयोग त्यांना शिवरायांना युद्धकला आणि राजनीतीचे शिक्षण देण्यासाठी झाला.  

राजमाता जिजाऊ या शिवरायांचे प्रेरणापीठ, विद्यापीठ आणि ज्ञानपीठ आहेत. शिवकाळात औपचारिक शिक्षण उपलब्ध नसताना जिजाऊंनी शिवबाला जे शिक्षण दिले ते क्रांतिकारक शिक्षण होते. इतिहासकार वा. सी. बेंद्रे म्हणतात, शिवरायांना युद्धकला, राजनीती आणि नैतिकतेचे बाळकडू जिजाऊंनीच दिले होते. शिवरायांसारखा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा राजा जिजाऊंनी घडविला. शिवबांबरोबरच शंभूराजांना युद्धकला, राजनीती आणि विविध भाषांचे शिक्षण देण्याचे कार्यही जिजाऊंनी केले. 

आपले क्रांतिकारक पती शहाजीराजे यांचे स्वराज्य संकल्पनेचे कार्य जिजाऊंनी हिमतीने, निर्भीडपणे आणि मोठ्या योजकतेने पूर्णत्वास नेले. संभाजीराजे स्वराज्यरक्षक आहेत. शिवाजीराजे स्वराज्यनिर्माते आहेत. शहाजीराजे स्वराज्य संकल्पक आहेत, तर जिजाऊ या स्वराज्यप्रेरिका आहेत. जिजाऊ निर्भीड, हिंमतवान आणि कर्तृत्त्ववान होत्या. जिजाऊंचे व्यक्तिमत्त्व हे क्रांतिकारक होते. बालपणापासूनच तलवारबाजी आणि राजनीतीमध्ये त्या निपुण होत्या. याबाबतचे वर्णन समकालीन परमानंदाने त्याच्या ‘शिवभारत’ या ग्रंथात केलेले आहे. परमानंद लिहितो, ‘राजगडावर राहणारी शिवाजीची माता, जिजाऊ आपल्या गडाच्या रक्षणासाठी दक्ष झाली’ (अध्याय 26/5). जिजाऊ या स्वराज्यरक्षणासाठी कशा दक्ष असत याचे वर्णन परमानंद करतो. शिवाजीराजे पन्हाळगडावरील वेढ्यात अडकले असताना त्यांची सुटका करण्यासाठी जिजाऊ हातात तलवार घेऊन आणि घोड्यावर बसून निघालेल्या आहेत. त्यावेळेस जिजाऊ काय म्हणतात याचे वर्णन परमानंद पुढीलप्रमाणे करतो, ‘माझ्या पुत्रास सोडविण्याचा मी स्वत: प्रयत्न करीन आणि जोहराचे मुंडके आज युद्धातून घेऊन येईन’ (अध्याय 26/14). 

समकालीन पुराव्यांवरून स्पष्ट होते, की संकटसमयी जिजाऊ या जपमाळ ओढत बसणार्‍या नव्हत्या, तर हातात तलवार घेऊन लढणार्‍या होत्या. यशासाठी प्रयत्नांची गरज असते, हे जिजाऊ चरित्रावरून स्पष्ट होते. जिजाऊंचे कार्य हे केवळ चूल आणि घर या परिघापुरते नव्हते, तर स्वराज्य हेच जिजाऊंचे घर होते. स्वराज्यातील सर्व जाती-धर्मांतील मुलांना त्यांनी आपल्या शिवबाप्रमाणे वागविले. जिजाऊंनी कधीही भेदाभेद केला नाही. जिजाऊ समतावादी होत्या. त्यामुळेच सर्व जाती-धर्मांची मुले शिवरायांसाठी प्राणार्पण करण्यासाठी पुढे आली.

शिवरायांना सतत प्रेरणा देऊन विजय मिळवून देणारी असे वर्णन परमानंद करतो. तो लिहितो, ‘शहाजीराजांची महाराणी जिजाऊ म्हणजे पृथ्वीतलावर अत्यंत जागरूक असणारी महासाध्वी, यशस्वीनी, विजयवर्धिनी अशी जाधवरावांची कन्या आहे’’ (अध्याय 5/ 53). इ. स. 1642 ते 1674 या बत्तीस वर्षांच्या काळात स्वराज्य स्थापनेपासून ते राज्याभिषेकाप्रसंगापर्यंत प्रत्येक कठीण प्रसंगी जिजाऊ या शिवरायांच्या पाठिशी पहाडासारख्या उभ्या राहिल्या. स्वराज्यात न्यायनिवाडा करण्याचे काम सुरुवातीला जिजाऊंनी केले. आपल्या 12 वर्षांच्या शिवबाला शेजारी बसवून निःपक्षपाती न्यायदान कसे करावे, याचे बाळकडू जिजाऊंनी दिले. जिजाऊंनी ओसाड पडलेल्या पुनवडीत नांगर फिरवून शेती करण्यास सुरुवात केली. शेतकर्‍यांना अभय मिळताच पुनवडीचे पुणे झाले. अफजलखान, शाहिस्तेखान यांना धडा शिकवण्याची ऊर्जा जिजाऊंची होती. शिवाजीराजे आग्रा येथे असताना एक इंचभर भूमीदेखील शत्रूला जिंकू न देणार्‍या जिजाऊ या स्वराज्याचा मोठा आधारवड होत्या. राज्याभिषेकप्रसंगी धर्ममार्तंडांचा विरोध झुगारून देऊन तो समारंभ पार पाडणार्‍या जिजाऊ होत्या. जिजाऊ लढणार्‍या होत्या, रडणार्‍या नव्हत्या. जिजाऊंनी भविष्य, पंचांग, मुहूर्त पाहिला नाही. कारण, त्या बुद्धिप्रामाण्यवादी होत्या. त्यांचा विश्‍वास कर्तृत्त्वावर होता, भविष्य-पंचांगावर नव्हता. मुलगीदेखील हिंमतवान, कर्तृत्त्ववान आणि बुद्धिमान असते ही प्रेरणा जिजाऊ चरित्रातून आपणास मिळते. 

राजमाता जिजाऊंच्या कर्तृत्त्वाचे आणि व्यक्तिमत्त्वाचे वर्णन शहाजीराजांच्या पदरी असणारा जयराम पिंडे पुढीलप्रमाणे करतो. 
जशी चंपकेशी खुले फुल बाई । 
भली शोभली ज्यास जाया जिजाई ॥ 
जिचे किर्तीचा चंबु जंबुद्विपाला। 
करी साउली माउली मुलाला॥ 

अर्थ : जिजाऊ शहाजीराजांसारख्या धैर्यशाली, पराक्रमी पुरुषाला पत्नी म्हणून शोभून दिसते. त्यांच्या कर्तृत्त्वाने आणि गंभीर वृत्तीने त्यांची कीर्ती सर्व भरतखंडावर पसरली होती. इतकेच नव्हे तर त्यांच्या कीर्तीच्या चंबूखाली-सावलीखाली सर्व जंबुद्वीपातील सज्जन लोक आश्रयाला येत असत. असे वर्णन पिंडे करतो. 

जिजाऊ या केवळ शिवबांच्या माता होत्या, एवढीच त्यांची ओळख नाही, तर त्या स्वतः कर्तृत्त्ववान होत्या. त्यांची प्रेरणा घेऊन आज आपण मुलींच्या जन्माचे स्वागत केले पाहिजे, मुलींना संधी आणि शिक्षण दिले पाहिजे. मुलाप्रमाणेच मुलगीदेखील वंशाला दिवा आहे, हा विचार अंगिकारला पाहिजे. जिजाऊ चरित्रातून समता आणि बुद्धिप्रामाण्यवाद शिकला पाहिजे. त्या काळात ढाल-तलवारींची लढाई होती. आज विचारांची आणि ज्ञानाची लढाई आहे. जिजाऊंची प्रेरणा घेऊन आज ज्ञानसंपन्न झाले पाहिजे.