Thu, Jul 18, 2019 06:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भिवंडीत राजीव गांधी उड्डाणपुलाला भगदाड

भिवंडीत राजीव गांधी उड्डाणपुलाला भगदाड

Published On: Sep 06 2018 1:41AM | Last Updated: Sep 06 2018 1:41AMभिवंडी : वार्ताहर

भिवंडीतील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील अंजूरफाटा ते वंजारपट्टी नाक्यादरम्यान असलेल्या राजीव गांधी उड्डाण पुलाला भगदाड पडून काँक्रिटचा भाग कोसळल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कुणीही जखमी झाले नसून या उड्डाणपुलावरील दोन्ही बाजूकडील वाहतूक बंद करण्यात आली आहे. महापालिकेकडून तातडीने स्थापत्यतज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊन उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येणार असले तरी या मार्गावरील वाहतूक थांबवल्याने वंजारपट्टी नाका ते अंजूरफाटा या रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.

सन 2006 मध्ये भिवंडी महापालिकेने या मुख्य रस्त्यावरील उड्डाणपुलाचे बांधकाम केले असून, या पुलावरून दिवसरात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. या पुलावर मागील दोन महिन्यांत झालेल्या मुसळधार पावसाने खड्डे पडले होते. परंतु खड्ड्यांची वेळेत दुरुस्ती न केल्याने बुधवारी सकाळी 8.30 च्या सुमारास एसटी स्टॅण्डसमोरील उड्डाणपुलाखालील भागातील काँक्रिटचे प्लास्टर कोसळले. त्यामुळे नागरिकांमध्ये एकच घबराट उडाली. सुदैवाने पुलाखालील शौचालयासमोर गर्दी नसल्याने प्राणहानी टळली. दरम्यान, भिवंडीतील उड्डाणपूल कोसळला अशा अफवा सोशल मीडियावर पसरल्याने पुलाजवळ नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. 

राजीव गांधी उड्डाणपुलावर पावसाळ्यात जमा होणार्‍या पाण्याचा योग्य प्रकारे निचरा न झाल्याने उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले होते. परंतु त्याच्या दुरुस्तीकरीता मनपा प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना करण्यात न आल्याने ही घडली असून, या प्रकारास मनपा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप स्थानिक नागरिक अनंत पाटील यांनी केला आहे. उड्डाणपुलाच्या बांधकामात निकृष्ट साहित्य वापरल्याने संबंधित ठेकेदार आणि अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस नगरसेवक अरुण राऊत यांनी केली आहे.