Thu, Jul 18, 2019 00:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ३५०० लोकांना वाचवणार्‍या खारकरना हीन वागणूक 

३५०० लोकांना वाचवणार्‍या खारकरना हीन वागणूक 

Published On: May 12 2018 1:48AM | Last Updated: May 12 2018 1:26AMठाणे : प्रतिनिधी 

वयाच्या 12व्या वर्षापासून खाडीत पडलेल्या साडेतीन हजार नागरिकांना जीवदान देणार्‍या तसेच 3 हजारांपेक्षा अधिक मृतदेह बाहेर काढणार्‍या कळव्यातील राजेश खारकर यांना ठाणे पोलिसांनी आतापर्यंत शेकडो प्रमाणपत्रे देऊन सन्मानित केले आहे. मात्र हीच प्रमाणपत्रे पुन्हा पोलिसांना परत देण्याची वेळ प्रमाणपत्र देणार्‍या पोलिसांनी त्यांच्यावर आणली आहे. बेकायदा वृक्षतोडीची तक्रार केल्याने दोषीला सोडून पोलिसांनी खारकर यांनाच अपमानास्पद वागणूक दिली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जोपर्यंत पोलीस जाहीर माफी मागणार नाहीत, तोपर्यंत ही प्रमाणपत्रे परत घेणार नाही, अशी भूमिका खारकर यांनी घेतली आहे. 

विटावा परिसरात खारकर यांचे मालकीचे घर असून त्यांच्या मालकीची पाच झाडेदेखील आहेत. 18 एप्रिल रोजी खारकर आपल्या कुटुंबीयांसमवेत आपल्या एका नातेवाइकाच्या लग्नासाठी गेले असताना जेव्हा ते आपल्या घरी परतले तेव्हा त्यांच्या मालकीची पाच झाडे तसेच भाडेकरूंसाठी बांधण्यात आलेले शौचालय तोडण्यात आले होते. याची तक्रार त्यांनी ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकारण विभागाकडे तसेच ठाणे कळवा पोलिसांकडे केली आहे. विशेष म्हणजे याबाबत ठाणे पालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांना देखील त्यांनी पत्र दिले असून, मात्र कोणत्याच यंत्रणांकडून याची दाखल घेण्यात आली नाही. 

खारकर यांनी दिलेल्या तक्रारीवर पोलिसांकडून कोणत्याच प्रकारची कारवाई तर झाली नाहीच, उलट कळवा पोलिसांनी खारकर यांनाच पोलीस ठाण्यात बोलावून त्यांना अपमानास्पद वागणूक दिली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

यासंदर्भात कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. आर. बागडे यांच्याशी संपर्क साधला असता खारकर यांच्याविरोधातदेखील शेजारी राहणार्‍यांची तक्रार असल्याने केवळ दोघांना बोलावून समजून सांगण्यासाठी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. खारकर हे शेजार्‍यांच्या जागेत घाण पाणी टाकत असल्याची एका महिलेची तक्रार होती. त्यांना केवळ विचारपूस करण्यासाठी पोलीस ठाण्यात बोलावले असल्याने त्यांचा स्वाभिमान दुखावला असल्याची माहिती बागडे यांनी दिली आहे.