होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राजभवन हा सत्ताधार्‍यांचा अड्डा

राजभवन हा सत्ताधार्‍यांचा अड्डा

Published On: May 19 2018 1:33AM | Last Updated: May 19 2018 1:18AMमुंबई : प्रतिनिधी

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत बहुमत मिळालेले नसतानाही सत्तास्थापनेसाठी लोकशाहीचे सर्व संकेत भाजपाकडून पायदळी तुडविले जात आहेत. यापूर्वी गोवा, मणिपूर, मेघालयमध्ये राज्यपालांनी भाजपच्या दबावाखाली निर्णय दिलेले आहेत. कर्नाटकमध्ये देखील तेच घडत असून लोकशाही व्यवस्थेत राजभवन हे सत्ताधार्‍यांचा अड्डा झालाय, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली.

भाजपाच्या कर्नाटकातील कृतीच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे शुक्रवारी राज्यभरात लोकशाही वाचवा दिवस हे एकदिवसीय सांकेतिक धरणे आंदोलन करण्यात आलेले आहे. मुंबईत अमर जवान ज्योतीजवळ काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन झाले. मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम, माजी मंत्री सुरेश शेट्टी, एकनाथ गायकवाड, चरण सिंग सप्रा, आ. भाई जगताप, उत्तम खोब्रागडे, मनपा विरोधी नेते रवी राजा आदी उपस्थित होते. 

भाजपने देशातील लोकशाही व्यवस्थाच धोक्यात आणून ठेवलेली आहे. राज्यपाल देश चालवत आहेत असे चित्र निर्माण झालेले आहे. कर्नाटकात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी दबावतंत्र वापरून राज्यपालांना निर्णय घ्यायला भाग पाडलेे आहे. कर्नाटकचे राज्यपाल आरएसएसचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळेच बहुमत नसतानादेखील त्यांनी भाजपच्या बाजूने निकाल दिला. भाजपकडून राजभवनाचा वापर राजकारणासाठी करून लोकशाहीचा गळा घोटला जात असल्याचे चव्हाण म्हणाले.