Sun, Jan 19, 2020 16:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले यांचे निधन

एका पँथर पर्वाचा अस्त; राजा ढाले यांचे निधन

Published On: Jul 16 2019 8:52AM | Last Updated: Jul 16 2019 11:03AM
मुंबई : विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्रातील दलितांवरील अन्याय अत्याचाराच्या विरोधात निर्भीडपणे आवाज उठवत दलित पँथरची चळवळ उभा करणारे राजा ढाले यांचे विक्रोळी येथील निवासस्थानी आज, मंगळवारी (दि.१६) सकाळी निधन झाले. राजा ढाले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या निधनाची दुःखद वार्ता कळताच आंबेडकरी जनतेत तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे. 

त्यांची अंत्ययात्रा उद्या, बुधवारी (दि.१७) दुपारी १२ वाजता विक्रोळी पूर्वेतील त्यांच्या निवासस्थानाहून सुरू होऊन दादर चैत्यभूमी येथिल इलेक्ट्रिक स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. 

महाराष्ट्रात दलितांवरील अन्याय अत्याचाराने कळस गाठला होता. दलितांची हत्या, दलित महिलांवरील बलात्काराचे गुन्हे आणि दलित वस्त्या जाळण्याचे प्रकार वाढले होते. याविरोधात कणखर भूमिका घेत, राजा ढाले यांनी उभ्या महाराष्ट्रात आपल्या लेखणीने अंगार पेटवला. १९७२ साली पँथरच्या स्थापनेनंतर राजा ढाले यांचा साधना साप्ताहिकातील लेख अत्यंत गाजला होता. त्यांच्यावर सरकारने देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. जो तिरंगा आमच्या आया-बहिणींची अब्रू वाचवू शकत नाही तो आमच्या काय कामाचा? असा सवाल करत राजा ढाले यांनी भारतीय राज्यसत्तेला खुले आव्हान दिले होते.

भारत सरकारने त्यांना अटक केली. या अटकेच्या विरोधात महाराष्ट्रातील उभा दलित समाज एक झाला आणि मुंबई शहरात ना भूतो न भविष्यती असा विराट मोर्चा निघाला. या मोर्चावर लालबाग येथे इमारतीच्या टेरेसवरून दगडी पाटा फेकण्यात आला. त्यात भागवत जाधव या तरुणाचा मृत्यू झाला होता, तेथून दंगली पेटल्या आणि महाराष्ट्रभर पॅंथरच्या डरकाळ्या घुमू लागल्या.

राजा ढाले यांच्या बुद्धिमत्तेची आणि लेखणीची ही कमाल होती. त्यांच्यासोबत नामदेव ढसाळ, भाई संगारे, अविनाश महातेकर, ज. वी. पवार यांनी एकत्र काम केले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी ढाले यांच्या विक्रोळी कन्नमवार नगर येथील निवासस्थानी जाऊन त्यांची पत्नी आणि कन्या गाथा ढाले यांची भेट घेऊन सांत्वन केले.

पॅंथरचा एक धगधगता अंगार हरपला आहे, अशा शब्दात महातेकर यांनी त्यांना आदरांजली वाहिली. ढाले यांच्या आंबेडकरी विचारांनी प्रेरित झालेल्या धगधगत्या विचारातूनच महाराष्ट्रभर कार्यकर्त्यांची फळी उभी राहिली आणि त्या प्रेरणेतूनच अनेक नेते घडले, प्रचंड बुद्धिमत्ता असलेला नेता, विचारवंत आपल्यातून गेला आहे. याबद्दल मला तीव्र वेदना होत आहेत, असे महातेकर यावेळी म्हणाले. काल रात्रीच गाथा ढाले हिची भेट झाली, त्यावेळी राजा ढाले यांना केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले आणि महातेकर यांच्याशी काहीतरी बोलायचे होते, असा निरोप दिला होता, मात्र संभाषण होऊ शकले नाही, त्याचे दुःख आहे, असे महातेकर यावेळी म्हणाले.

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना राजा ढाले यांच्या निधनाची वार्ता कळताच त्यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार, मार्गदर्शक, दलित पँथरचा महानायक हरपला आहे अशी शोकभावना व्यक्त करून मंत्री रामदास आठवले यांनी दिवंगत राजा ढाले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. 

राजा ढाले यांनी भारिप बहुजन महासंघाच्या तिकिटावर १९९९ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या उत्तर मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र ते पराभूत झाले होते. मराठीतल्या सत्यकथेची सत्यकथा त्यांनीच लिहिली. महाराष्ट्रातल्या एका खेड्यात दलित तरुणीवर बलात्काराची घटना घडली होती. त्यानंतर भारतीय स्वातंत्र्यालाच प्रश्न करणारा काळा स्वातंत्र्यदिन हा लेखही त्यांनी लिहिला होता.  त्यांच्या परखड विचारांसाठी आणि आक्रमकतेसाठी ते प्रसिद्ध होते.