Tue, Sep 17, 2019 21:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मी मांडतोय त्याचे भाजप उत्तर का देत नाही? : राज ठाकरे (video)

मी मांडतोय त्याचे भाजप उत्तर का देत नाही? : राज ठाकरे (video)

Published On: Apr 24 2019 8:55PM | Last Updated: Apr 24 2019 9:19PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

पश्चिम महाराष्ट्रात घणाघाती भाषणांवर झंझावाती सभानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दुसऱ्या टप्प्यातील सभा मुंबईमध्ये होत आहेत. राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाभाडे काढले. त्यांनी  उज्वला योजनेतील पहिली लाभार्थी असणाऱ्या गुड्डीदेवींचा व्हिडिओ सादर करून  पोलखोल केली. 

राज यांनी गॅस दरवाढीवर भाजप नेते विरोधात असताना जी वक्तव्ये करत होते तीच सभेत दाखवून दिली. उज्वला योजनेचा उडालेला बोजवारा त्यांनी सभेतून दाखवून दिला. गॅस दरवाढीने वैतागलेल्या उज्वला योजनेतून गॅस मिळालेल्या लाभार्थींनी चुलीवर जेवण सुरू केल्याचा व्हिडिओच त्यांनी सादर केला. यामध्ये गुड्डीदेवी या पहिल्या लाभार्थी होत्या, त्यांनीही आता चुलीवर जेवण करायला सुरुवात केली आहे. 

मोदी नेहरू आणि  इंदिरा गांधी यांचीच कॉपी करत असल्याचा टोमणा मारला. नेहरुंच्याच प्रथमसेवकचे मोदींनी प्रधानसेवक केल्याचे राज म्हणाले. २०१४ मध्ये घरगुती गॅस ४१० रुपयाला मिळत होता, आज साडेसातशे रुपयांना मिळतो. सध्या उज्वला योजनेत फक्त ३० टक्के लोक गॅस घेतात, असे राज म्हणाले. 

राज यांनी मोदींच्या वडनगर गावाचा पंचनामा केला. मोदींच्याच गावामध्ये शौचालये नसल्याचे त्यांनी दाखवून दिले. मोदींच्या गावाची परिस्थिती इतकी वाईट तर देशाची किती वाईट असेल याचा विचार करा, असेही राज म्हणाले. पाच वर्ष फक्त नेहरु आणि इंदिरा गांधींना नाव ठेवली.

राज म्हणाले...

मी २०१४ च्या आधी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे जेवढे वाभाडे काढले तेवढे भाजपवाल्यानी देखील काढले नव्हते, आधीचे नालायक आहेत असं वाटलं तर हे त्यांच्याहून अधिक नालायक निघाले. 

किरीट सोमय्यांनी व्होटिंग मशीनमध्ये घोळ आहे असं २०१४ च्या सांगितलं होतं, हेच किरीट सोमय्या हातात पट्टी घेऊन रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मची उंची मोजत होते, पण २०१४ नंतर किरीट सोमय्या ह्या विषयवार बोलायला तयार नाही.

मी कोत्या मनाचा माणूस नाही. चांगलं काम केलं असतंत तर मी कौतुक केलं असतं पण जर चुकलात तर हा राज ठाकरे तुम्हाला प्रश्न विचारणारच 

पुलवामा येथे दहशतवादी हल्ला होऊ शकतो ह्याची पूर्वसूचना होती. तरीही काश्मीरचे राज्यपाल म्हणाले की हे गुप्तचर यंत्रणांचं हे अपयश आहे? पूर्वसूचना मिळून देखील का नाही काळजी घेतली? संपूर्ण देश दुःखात असताना मोदी रंगबेरंगी कपड्यात, चेहऱ्यावर हसू घेऊन फिरत होते. हा फकीर नाही हा बेफिकीर 

नोटबंदी आणि जीएसटीमुळे साडेचार ते पाच कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. कल्पना करा किती लोकांचं आयुष्य उध्वस्त झालं असेल ह्या निर्णयामुळे. नोटबंदीच्या वेळेस मला फक्त ५० दिवस द्या, सगळं सुरळीत करून दाखवतो असं म्हणणारे पंतप्रधान आज ह्या विषयावर गप्प का बसलेत?

विरोधी पक्षात असताना दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार देऊ असं मोदी म्हणाले होते. म्हणजे ५ वर्षात १० कोटी लोकांना नोकऱ्या देणार होते. प्रत्येक कुटूंबात ४ माणसं गृहीत धरली तर साधारणपणे ४० कोटी लोकांचं आयुष्य बदलून गेलं असतं. पण ह्यांनी काहीच केलं नाही फक्त खोटी स्वप्न दाखवली.

उज्वला गॅस योजनेत ज्या महिलेला गुड्डी देवी ह्यांना स्वतः ह्या योजनेतील पहिला गॅस दिला. पण पहिल्या सिलेंडरच्या नंतर त्यांना दुसरा सिलेंडर घेणं परवडणं शक्य नाही कारण सिलेंडरच्या किंमती अव्वाच्या सव्वा आहेत. ही परिस्थिती देशभर आहे.