Sun, Mar 24, 2019 04:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आकडे फेकायला आपण रतन खत्री आहोत का?

आकडे फेकायला आपण रतन खत्री आहोत का?

Published On: Mar 10 2018 2:16AM | Last Updated: Mar 10 2018 2:03AMमुंबई : प्रतिनिधी

‘आपण जी सदस्य नोंदणी करत आहोत ती इतर राजकीय पक्षांसारखी बोगस करायची नाही. भाजपासारखी आकडे दाखवण्यासाठी नोंदणी करायची नाही. आकडे फेकून काही होणार नाही. आकडे फेकायला आपण काय रतन खत्री आहोत का’, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या सदस्य नोंदणी मोहिमेचा शुभारंभ करताना भारतीय जनता पक्षाला चिमटा काढला आहे.  

                                      
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 12 व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईतील रंगशारदा येथे सदस्य नोंदणी मोहिमेच्या शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मनसैनिक हे माझे कुटुंब असल्याचे सांगितले. मला जे बोलायचे आहे ते मी 18 तारखेला शिवतीर्थावर बोलणार, असेही त्यांनी जाहीर केले. ‘18 तारखेला मी बोलणार असल्याने तुम्ही घरी पूर्वकल्पना द्या. बाजारातून मेणबत्त्या आणून ठेवा. कारण अनेक ठिकाणी माझ्या सभेच्या वेळी वीज घालवण्याचे धंदे सुरू होतात. मनसैनिकांनी दिवे घालवणार्‍या अधिकार्‍यांशी आधी बोलून ठेवावे. यावेळी जर सभा सुरू असताना अशा काही गोष्टी केल्या तर त्यांना तुडवा. जर इतर पक्षांच्या दबावाला बळी पडून वीज घालवणार असतील तर त्यांना हिसका दाखवणे गरजेचे आहे’, असे त्यांनी सांगितले.

मनसैनिकांनी सदस्य नोंदणीची माहिती देणारे फलक लोकांना दिसतील अशा ठिकाणी लावावे, असे आदेश त्यांनी दिले. याप्रसंगी राज ठाकरेंच्या काही प्रमुख व्यंगचित्रांच्या पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. मराठी महिला जगत, महाराष्ट्रातील कर्तबगार पुरुष, मराठी कुळ आणि मूळ ही तीन पुस्तके मनसैनिकांनी जरुर वाचावी, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.