होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज ठाकरेंचे मोदींसह अमित शहांना फटकारे 

राज ठाकरेंचे मोदींसह अमित शहांना फटकारे 

Published On: Jan 23 2018 9:02PM | Last Updated: Jan 23 2018 9:10PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

हज यात्रेकरुंच्या अनुदान बंद करण्याचा निर्णयावर व्यंगचित्राच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुजरात निवडणुकीतील निकालावर भाष्य केले आहे. गेल्या महिन्यात देशात अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी झाल्या. काही घटनांवर फटकेबाजी करायची राहून गेली होती, असे सांगत राज यांनी गुजरात निवडणुकीच्या आठवणींना उजाळा देत मोदी सरकारच्या दुखण्यावर बोट ठेवले.  

मोदी सरकारच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी सरकारला टोले लगावले. सरकारचे कर्तृत्वच असे आहे, की व्यंगचित्रकारांना विषयाची कमतरता जाणवू शकत नाही, अशा शब्दांत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

'जिंकलं कोण आणि हरलं कोण? असा प्रश्न उपस्थित करत राज ठाकरे यांनी एक व्यंगचित्र रेखाटले आहे. या व्यंगचित्रात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना गुजरातमधील पहिल्या क्रमांकाचा पक्ष असल्याचे दाखवले. मात्र, दोन्ही नेत्यांना अपेक्षित यश मिळाले नसल्याची खंत आहे, असे व्यंगचित्र राज यांनी साकारले आहे.  

गुजरात निवडणुकीतील काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची कामगिरी समाधानकारक झाली. त्यामुळेच 'हरले कोण आणि जिंकले कोण? असा प्रश्न निर्माण होणे स्वभाविक आहे, असे व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहे. राहुल गांधी समाधानी असल्याचे दाखवत गुजरातमध्ये मोदी-शहा पॅटर्न अपयशी ठरल्याचे राज यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले आहे.