Wed, Nov 14, 2018 14:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मार खाल, तर पदाला मुकाल : राज ठाकरे

मार खाल, तर पदाला मुकाल : राज ठाकरे

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

 

मुंबई : खास प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून मनसेचे कार्यकर्ते मार खात असल्याने अस्वस्थ  असलेल्या मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज आपल्या पदाधिकार्‍यांची चांगलीच कानउघाडणी केली. नीट नियोजन करूनच आंदोलने करा, आता मार खाऊन याला तर पदावरून काढून टाकेन, असा सज्जड दम राज यांनी भरला. यामुळे आता मनसे आणि फेरीवाल्यांतील संघर्ष अधिक गंभीर वळण घेणार असे दिसते. 

अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील आंदोलनात मनसेच्या कार्यकर्त्यांना मारहाण होत आहे. आधी पश्चिम उपनगरांत आणि रविवारी विक्रोळीत मनसेच्या आंदोलनकर्त्या पदाधिकार्‍यांना अमराठी लोकांकडून मारहाण झाली. मराठी पाट्या दुकाने आणि आस्थापनांवर लावण्याचा आग्रह धरणारे पत्र घेऊन विक्रोळीत मनसेचे कार्यकर्ते दुकाना दुकानांत फिरत होते. त्यांच्यावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करून जबर मारहाण केली. मनसेचे अनेक कार्यकर्ते या हल्ल्यात जखमी झाले. या हल्ल्यांमुळे अस्वस्थ असलेल्या राज यांनी आज विभागाध्यक्षांना कृष्णकुंज  वर बोलावून घेतले होते. कोणतेही नियोजन न करता अशी आंदोलने करू नका आणि आपापल्या विभागाच्या बाहेर जाऊ नका, असे सांगताना मनसे हा मार खाणार्‍यांचा पक्ष नाही, तर मार देणार्‍यांचा आहे, त्यामुळे यापुढे मार खाऊन याल तर पदावरून काढून टाकेन, अशी समज देखील राज यांनी विभागाध्यक्षांना दिली. 

दरम्यान, अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासंबंधीच्या हायकोर्टाच्या निर्णयाची प्रत आणि त्यासोबत राज ठाकरे यांचे पत्र येत्या शुक्रवारपासून मनसेच्या पदाधिकार्‍यांना दिले जाणार असून ही पत्रे पोलीस, महापालिका आणि रेल्वे अधिकार्‍यांना देण्यात येणार आहेत. फेरीवाल्यांविरोधात या यंत्रणेकडून होणार्‍या कारवाईवर नजर ठेवा, असेही राज यांनी विभागाध्यक्षांना बजावले आहे.