Fri, Apr 26, 2019 19:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'फडणीसांचा चष्मा राज ठाकरे दुरुस्त करतात'

'फडणीसांचा चष्मा राज ठाकरे दुरुस्त करतात'

Published On: Jan 22 2018 1:48AM | Last Updated: Jan 22 2018 1:48AMठाणे : प्रतिनिधी 

मनसेप्रमुख तथा व्यंगचित्रकार राज ठाकरे रविवारी ठाण्यातील ज्ञानराज सभागृहात आले, तेव्हा एकच गर्दी झाली. व्यासपीठासमोरच ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस आणि प्रभाकर झळके बसले होते, या दोघांना त्यांनी वंदन केले. तेवढ्यात गर्दीच्या धक्क्याने फडणीस यांच्या चष्म्याची काच पडली, राज यांनी व्यासपीठावर जाऊन त्यांच्या चष्म्यांची काच बसविली आणि फडणीस यांनी चष्मा घालायला दिला, त्यानंतर पुढील कार्यक्रम सुरू झाला.

व्यंगचित्रकारांनी कठोर भूमिका घ्यावी : राज ठाकरे

व्यंगचित्रकारांनी कडवट आणि कठोर भूमिका घेतली तर सरकारला आपल्या चुका कळतील. त्यामुळे व्यंगचित्रकारांनी भूमिका घ्यावी, असे आवाहन मनसेेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. व्यंगचित्रकार सम्राटचित्र बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार कार्टुनिस्ट कंबाईनच्या वतीने आयोजित संमेलनात राज ठाकरे यांच्या हस्ते ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. 

व्यासपीठावर शि. द. फडणीस, संमेलनाचे अध्यक्ष विवेक मेहेत्रे, नगरसेविका रुचिता मोरे, नगरसेवक राजेश मोरे, पितांबरी कंपनीचे विश्‍वास दामले उपस्थित होते. पाचपाखाडीमधली ज्ञानराज मंदिराच्या सभागृहात हा सोहळा झाला. जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार डेव्हिड लो या व्यंगचित्रकाराकडे जगभराचे लक्ष असे, हुकूमशहा हिटलरही या व्यंगचित्रकाराला घाबरत असे, व्यंगचित्रात ताकद असते, ही ताकद जगाला कळू द्या, महाराष्ट्रात व्यंगचित्रकला समृद्ध व्हावी, अशा भावना राज यांनी व्यक्‍त केल्या. 

आपल्याकडे सध्या सरकारच्या बाजूने लिहिले तर सरकारचे भक्त आणि विरोधात लिहिले तर राष्ट्रदोही अशी परिस्थिती आहे, पण असे करून चालणार नाही, असेही त्यांनी सांगितले. लंडनमध्ये व्यंगचित्रांची पुस्तके घेण्यासाठी गेलो, तेव्हा त्या दुकानदाराने पॉलिटिकल कार्टूनवर पीएच. डी. केली होती, याला संस्कृती मुरणे असे म्हणतात, पूर्वी पुण्यात अलूरकर यांचे संगीत क्षेत्रातले अशाच प्रकारचे जाणकार दुकान होते. ज्यांना आवड आहे, त्यांनी अशा क्षेत्रात येण्याची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले. व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांनी महाराष्ट्रातल्या निवडक व्यंगचित्रांचे पुस्तक काढले आहे, हे पुस्तक म्हणजे  हा एक प्रकारचा अभ्यास आहे, त्यात महाराष्ट्रातल्या व्यंगचित्रांचा इतिहास आहे, असे त्यांनी नमूद केले. 

ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि.द. फडणीस म्हणाले, आज डिजिटल युगामुळे व्यंगचित्रकलेला वाटा मोकळ्या झाल्या आहेत. प्रभाकर झळके हे अंतर्बाह्य शांत माणूस, त्यांचा सन्मान हा योग्यच आहे. यावेळी दिवाळी अंकांचे संपादक भारतभूषण पाटकर, ज्ञा. वि. जरड, वैशाली मेहेत्रे यांचा ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नवोदित व्यंगचित्रकार स्पर्धेतील विजेते किशन गुप्ता, अजय गौड, सुधीर पगारे, आर्य प्रभुवेळुस्कर, राई राणे, एन. नीरजा या विजेत्यांना ठाकरे यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.