Mon, May 20, 2019 08:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पवार-राज भेटीने चर्चेला उधाण

पवार-राज भेटीने चर्चेला उधाण

Published On: Mar 18 2018 1:29AM | Last Updated: Mar 18 2018 1:11AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा रविवारी शिवाजी पार्क येथे होणार असताना, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आदल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले असले, तरी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राज ठाकरे यांनी आपल्या सभेच्या जाहिराती करताना भाजपविरोधी सूर लागल्याने 2019 च्या निवडणुकीसाठी भाजपविरोधी महाआघाडीची तयारी सुरू झाल्याची  चर्चा आहे.

मनसेच्या स्थापनेला बारा वर्षे झाली असताना, राज ठाकरे रविवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिवाजी पार्कवर जाहीर मेळावा घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या बारा वर्षांत मनसेची सर्वत्र पीछेहाट झाली आहे. विधानसभेत मनसेचा एकमेव आमदार असून तोही येत्या निवडणुकीत पक्षासोबत राहील की नाही, याबाबत शंका आहे. मुंबई, नाशिक, कल्याण-डोंबिवली आदी महापालिकांमध्येही मनसेची ताकद घटल्याने पक्षात मरगळ आली आहे.

राज ठाकरे यांच्या रविवारी होणार्‍या सभेची होर्डिंग्ज जागोजागी लावण्यात आली असून त्यामध्ये भाजपला टार्गेट केले आहे. त्यामुळे त्यांच्या भाषणाचा रोख हा केंद्र आणि राज्य सरकारवरच राहील हे स्पष्ट आहे. महामुलाखतीमध्येही पवार आणि राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर टीका केली होती. येणारी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीने एकत्र लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मनसेचा मराठीचा अजेंडा पाहता या आघाडीत राज ठाकरे यांचा समावेश कठीण आहे. मात्र, राज ठाकरे यांना शरद पवार यांनी कोणता कानमंत्र दिला आणि राज ठाकरे उद्या काय भूमिका मांडतात, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

 

Tags : Raj Thackeray, visit, Sharad Pawar, Mumbai residence, mumbai news