Mon, Oct 21, 2019 04:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज ठाकरेंची भाषणे म्हणजे करमणूक : विनोद तावडे(video)

राज ठाकरेंची भाषणे म्हणजे करमणूक : विनोद तावडे (video)

Published On: Apr 20 2019 3:36PM | Last Updated: Apr 20 2019 3:48PM
मुंबई : प्रतिनिधी 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रचार सभांना जाणारी लोक केवळ टाईमपास, मनोरंजन व करमणुकीसाठी जातात असे त्या सभेला जाणारी लोकच सांगतात. पण त्यांच्या पक्षाप्रमाणे आमचा पक्ष टुरिस्ट टॉकिजचा पक्ष नाही, आमचा राजकीय पक्ष विचाराने चालतो असा मार्मिक टोला शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज मारला.

राज ठाकरे यांच्या मताचा अधिकार सरकार काढतेय असा जावईशोध मनसे नेते अभिजीत पानसे यांनी लावल्याबद्दल प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना तावडे म्हणाले की, पानसे यांना बहुधा त्यांच्या  ठाकरे या त्यांच्या चित्रपटाची स्क्रिप्ट आठवली असेल, पण ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा मताचा अधिकार काढून घेतला त्यांनाच मते द्या असे आज राज ठाकरे सांगत आहेत, अशी टीकाही तावडे यांनी केली.

मनसेकडून विनाकारण खोटेनाटे आरोप पसरवून हौतात्म्य आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण राज ठाकरे यांचे मत पडले तर काय मोठा फरक पडणार नाही. कारण त्यांच्या सभांना गेलेला माणूस टाईमपाससाठी गेलो असे बोलत असल्याचे स्पष्ट करतानाच तावडे म्हणाले की, नोटाबंदी राज ठाकरे यांना का झोंबली आहे, जे सगळे पैसे बँकेत आले ते कोणाकोणाच्या नावाने आले, त्याची माहिती त्यांनी घेतली पाहिजे, म्हणजेचे जे पैसे बाहेर अनअकाऊंटेड फिरत होते ते अकाऊंटेड झाले याचा अर्थ काळा पैसा आला नाही का.. यासाठी अर्थकारण समजून घ्यावं लागतं आणि ते समजलं नाही की अशी काहीतरी गडबड होते, असा टोलाही त्यांनी मारला.

ज्या पक्षाने वर्षोनुवर्षे आपल्या सत्तेच्या कारकिर्दीत देशाच्या विकासासाठी काहीही विकासाची कामे केलेली नाहीत त्यांना मते द्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सुमारे ४० टक्के ड्रीम प्रोजेक्टची कामे पुर्ण केली व अजूनही काही प्रोजेक्टची कामे सुरु आहेत त्या मोदी सरकारला मात्र मत देऊ नका, असे म्हणणे म्हणजे राजकीय दिवाळखोरी आहे असेही तावडे यांनी सांगितले.

 राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा गणवेशात नाही तर विचारात आहे आणि मोहीते–पाटील यांनी त्या विचाराचा स्वीकार केला असेल तर शरद पवार यांना वाईट वाटण्याचे कारण नाही, असा टोला विनोद तावडे यांनी मारला.

‘मोहिते पाटील तुम्ही आता संघाची अर्धी चड्डी आणि शर्ट घालू नका’ या टीकेला प्रत्युत्तर देताना तावडे म्हणाले की, शरद पवार यांनी जेव्हा पुलोदचे मुख्यमंत्री होताना सुध्दा ते विचार स्वीकारले होते, तेव्हा संघाविषयी मांडलेली मते आठवून बघावीत. त्यामुळे तुमच्या सोयीसाठी तुम्ही सोयीचे राजकारण करता पण मोहिते-पाटील यांनी तसे केले नाही. संघ हा गणवेशात नाही तर विचारात आहे. त्यांनी संघाच्या विचारांचा स्वीकार केला आहे. या विचारासोबत जाऊन जर राज्याचा आणि देशाचा विकास होणार असेल तर तसे करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DEeePAgbWU94pj0zgYWo19