होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सरकारकडे नोकरभरतीची इच्छाशक्‍तीच नाही

सरकारकडे नोकरभरतीची इच्छाशक्‍तीच नाही

Published On: Aug 05 2018 6:15PM | Last Updated: Aug 05 2018 6:53PMकोपरखैरणे : वार्ताहर

देशात 24 लाख रिक्‍त पदे सरकारने भरलेली नाहीत. एकीकडे कोट्यवधींच्या घोषणा करायच्या आणि दुसरीकडे तरुणांना रोजगार द्यायचा नाही. सरकारकडे नोकर भरती करायला पैसे नाहीत किंवा सरकारची इच्छाशक्ती नाही, असा घणाघात राज ठाकरे यांनी रविवारी वाशी येथे केला. ते विष्णूदास भावे नाट्यगृहात आयोजित महाराष्ट्र नवनिर्माण मनपा कर्मचारी संघटनेच्या मेळाव्यात बोलत होते. मनपा कर्मचार्‍यांनी डोळ्यात तेल घालून शहरातील गैरप्रकारांकडे लक्ष ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले. 

आपल्या भाषणात राज यांनी विविध विषयांना स्पर्श केला. आपले सण तोंडावर आल्यावर लगेच नियम बाहेर येतात कुठुन? नमाज रस्त्यावर का पडू देता आणि मशिदीवरील भोंगे का हटवत नाहीत? असा सवाल करतानाच प्रत्येक धर्माला सामान न्याय द्या, असे आवाहन त्यांनी केले. सार्वजनिक गणेशोत्सवावर बंधने लादली जात असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. आघाडी सरकारच्या काळात याच मुद्द्यावर आताचे राज्यकर्ते टीका करायचे आता मात्र त्यांच्या कार्यकाळातही धार्मिक मुद्द्यांवर लादल्या जात असलेल्या बंदीबाबत राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. 

राज यांनी भाजपला विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना लक्ष्य केले. मोदी सरकारच्या काळात प्रसिद्धिमाध्यमांवर निर्बंध आणले जात आहेत. त्यामुळे  सरकारला आणीबाणीवर टीका करण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे राज म्हणाले. नवी मुंबई मधील भूखंड घोटाळ्यावर टीका करताना त्यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करीत मारवाडी विकासकांना भूखंड विकल्याबद्दल टीका केली. 

पालिकेच्या कर्मचार्‍यांनी आपण मराठी आहोत ही भावना जपावी, मोदींसारखे पहारेकरी न बनता खरे पहारेकरी बनावे, असे आवाहन त्यांनी केले. बिल्डर मोकळ्या भूखंडावर झोपडपट्टी वसवून एसआरए योजना राबवून घेतात. आसामप्रमाणे बांगलादेशी घुसखोरांच्या वस्त्या उभारल्या जात आहेत. शासनाने विक्री केलेल्या भूखंडांची माहिती जनतेला दिली पाहिजे, असे ते म्हणाले.

राज्यातील पालिका कर्मचारी या मेळाव्याला उपस्थित होते. बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अमित ठाकरे, राजू पाटील, संदीप देशपांडे, मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे आदी नेते उपस्थित होते.

 मराठा समाजाचे तरुण हक्काची लढाई लढत आहेत. त्यांना आंदोलनासाठी भाग पाडून त्यांच्यावर गंभीर गुन्हे लादले जात आहेत. मराठा आंदोलनात 7500 हजार तरुणांवर सरकारने  गुन्हे दाखल केले आहेत. 307 सारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याने या तरुणांना नोकर्‍या मिळतील का असा प्रश्न राज यांनी उपस्थित केला. सरकारकडून आरक्षण देण्यास टाळाटाळ केली जात आहे. आंदोलनात परप्रांतीय घुसल्याने आपले राज्य बदनाम होत आहे.  यामुळे आपल्या राज्याची बदनामी आपण रोखली पाहिजे, असे राज म्हणाले.