Wed, Mar 20, 2019 22:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज यांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचे खोचक प्रत्त्युतर

राज यांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचे खोचक प्रत्त्युतर

Published On: Mar 20 2018 1:49AM | Last Updated: Mar 20 2018 1:38PMमुंबई :  उदय तानपाठक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यांवर तसेच भाजपावर केलेल्या टिकेमुळे भाजपात तीव्र संताप व्यक्त होत असून, राज यांनी आपला स्तर पाहून बोलायला हवे अशी प्रतिक्रीया भाजपाने दिली आहे. माझ्याकडे मनोरंजनाची इतर साधने आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज यांच्या भाषणाची संभावना केली आहे. 

राज यांच्या भाषणावर शरद पवारांचा प्रभाव दिसून येतो, असे मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीने मात्र राज यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला.  गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज यांनी भाजपा आणि मोदी यांच्यावर कडाडून टीका केली होती. देश मोदीमुक्‍त व्हावा यासाठी सर्व पक्षांनी एकत्र यावे अशी हाक राज यांनी दिली होती. 

विधान भवनात सोमवारी राज यांच्याच भाषणाची चर्चा होती. राज यांनी थेट मोदी यांच्यावर चढवलेला हल्ला आणि मीडियाला दिलेल्या कानपिचक्या याचे विरोधकांना भलतेच कौतुक वाटत होते. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्यातील दुकानांवरील पाट्या मराठीतच असाव्यात, या राज ठाकरे यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. अनेक दुकानांच्या पाट्यांवरील बहुतांश मजकूर हा अन्य भाषेत असणे चुकीचे असून आम्ही राज यांच्या भूमिकेला पाठिंबा देत असल्याचे आव्हाड म्हणाले. 

भाजपातून मात्र कडवट प्रतिक्रीया देण्यात आली. ज्यांना जनतेने रोजगारमुक्त केले, त्यांनीच मोदीमुक्त भारत करण्याची मुक्ताफळे उधळली आहेत, असे मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी म्हटले आहे.  राज यांनी आपला स्तर पाहूनच बोलावे असा टोमणाही शेलार यांनी लगावला.आधी राज ठाकरेंच्या भाषणांवर बाळासाहेबांचा प्रभाव दिसत असे, पण हल्ली शरद पवार यांचा प्रभाव दिसून येतो, असे ते म्हणाले.  

2014 च्या निवडणुकीत विधानसभा मनसेमुक्त झाली, मुंबई महापालिकेतील उरले-सुरलेले नगरसेवकही पळून गेले. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता आता यांच्यावर विश्वास ठेवणार नाही, अशी टीका शेलार यांनी केली. 

राज यांनी पराभूत मानसिकतेतून केलेली ही केविलवाणी धडपड आहे.यांचे नेते गल्लीपुरते मर्यादित आहेत. ज्यांनी यांचे नगरसेवक पळवले, त्यांच्यावर टीका न करता भाजपाला लक्ष्य करण्याचा राज यांचा हा प्रयत्न केविलवाणा आहे, असे आमदार अतुल भातखळकर म्हणाले.

 

Tags : Raj Thackeray, speech, BJP, expressed strong resentment,