Thu, Jun 27, 2019 12:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नाणारजवळ परप्रांतीयांच्या जमिनी कशा?

नाणारजवळ परप्रांतीयांच्या जमिनी कशा?

Published On: Apr 22 2018 8:08AM | Last Updated: Apr 22 2018 1:35AMमुंबई : प्रतिनिधी

नाणार प्रकल्पाजवळ परप्रांतीयांना जमिनी कशा मिळाल्या, असा सवाल करत या प्रकरणाची चौकशी करायला हवी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केली आहेे. ते वृत्तवाहिनीशी बोलत होते.

एखादा प्रकल्प होणार आहे, याची माहिती अगोदरच या परप्रांतीयांना सरकारच्या माध्यमातूनच मिळत असणार, अशी शंका व्यक्‍त करून राज ठाकरे यांनी या सर्व प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली. अर्थात, चौकशी करूनही न्याय  मिळत नाही असे दिसतेच आहे, असेही ते म्हणाले. याप्रकरणी विरोधी पक्षांनी पुढाकार घ्यायला हवा व त्याच्या मुळाशी जायला हवे, असेही ते म्हणाले. 

खरोखरच या प्रकरणी परप्रांतीयांनी जमिनी घेतल्या की, त्यांच्या नावावर पैसे वळवून  त्या घेण्यात आल्या, त्याचीही चौकशी व्हायला हवी. परप्रांतीयांनी या ठिकाणी जमिनी घेण्यामागे नेमका उद्देश काय? अशी विचारणा करत ठाकरे यांनी महाराष्ट्रातील मोक्याच्या जमिनी बळकावण्याचे हे षड्यंत्र आसल्याचाही आरोप केला.

ब्र काढण्याचीही हिंमत नसलेले महाराष्ट्रातील सरकार म्हणजे सांगकाम्या असल्याची टीका करून ठाकरे यांनी, केंद्राने सांगायचे व यांनी ऐकायचे, हाच प्रकार सुरू असल्याचे सांगितले. नाणार प्रकल्प रद्द झाला तर तो गुजरातला जाईल, असे सांगितले जाते. कोणताही प्रकल्प गुजरातलाच का? अन्य राज्यांची नावे का घेतली जात नाहीत, असेही ठाकरे म्हणाले.

Tags : Mumbai, Raj Thackeray, ommunicated, news channel, Mumbai news,