Tue, May 21, 2019 12:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अजित पवारांनी मनाला लावून घेऊ नये : राज

अजित पवारांनी मनाला लावून घेऊ नये : राज

Published On: Aug 15 2018 1:44AM | Last Updated: Aug 15 2018 1:44AMठाणे : खास प्रतिनिधी

गेल्या दोन दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आरोप-प्रत्यारोपांची चर्चा सुरू आहे. पुण्यातील कार्यक्रमात पाणी फाऊंडेशनच्या कामामुळे जर जलसंधारणाची कामे होऊ शकतात, तर इतक्या वर्षांचा जलसंधारणाचा पैसा गेला कुठे ?असा थेट सवाल करत राज ठाकरे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला होता. या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी ठाण्यात ठाकरे म्हणाले, मी जे बोललो ते 1960 पासून सुरू आहे, त्यावर फक्त भाष्य केले होते. पवारांनी मनाला का लावून घेतले, हे मला माहिती नाही. पण, मनाला लावून घेऊ नका, असे सांगत त्यांनी पवारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

ठाण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेतली. तसेच ठाण्यातील काही नव्या पदाधिकार्‍यांच्या घोषणाही केल्या. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ठाकरे यांनी जलसंधारणाच्या कामाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले. अभिनेता आमिर खान यांचे पाणी फाऊंडेशनने  लोकसहभागातून  1 लाख 20 हजार विहिरी बांधल्या, तर मग तुमचे अधिकारी काय करतात? संपूर्ण राज्यभरात एक लाख वीस हजार विहिरी बांधल्याचे मुख्यमंत्र्यांचे बोलणे खोटे आहे, असा दावाही ठाकरे यांनी केला आहे.  अनेक जुन्या विहिरी पेपरवर दाखवल्या जात आहेत. जर लोकसहभागातून कामे होणार असतील, तर मग सरकार काय करते, सरकारी अधिकारी आमिर खानसाठी काम करतायेत का?  मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अपयश आमिर खानच्या आड लपवू नये. जर अधिकार्‍यांना अमिर खानच्या या उपक्रमाला जावे लागत आहे. मग, सरकार आणि सरकारमधील अधिकारी काय करतात,  असा प्रश्नही ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला.