Thu, Nov 22, 2018 01:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज ठाकरे-शरद पवार नाट्यसंमेलनाच्या रंगमंचावर एकत्र

राज ठाकरे-शरद पवार नाट्यसंमेलनाच्या रंगमंचावर एकत्र

Published On: Jun 07 2018 2:07AM | Last Updated: Jun 07 2018 1:39AMमुंबई : खास प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसेप्रमुख राज ठाकरे पुन्हा एकदा एका रंगमंचावर येणार आहेत. होय! रंगमंचावरच!! कारण याचे निमीत्त आहे मराठी नाट्यसंमेलन. काही महिन्यांपूर्वी पुण्यात हे नेते जाहीरपणे एकत्र आले होते. राज यांनी त्यावेळी घेतलेली पवारांची महामुलाखत चांगलीच गाजली होती. आता मुलुंडमध्ये हे नेते एकाच रंगमंचावर एकत्र येणार आहेत. 

98 वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन 13 जूनपासून मुलुंडमध्ये सुरू होत आहे. या संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला या दोन्ही नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर हे संमेलनाचे उद्घाटक, तर शरद पवार आणि राज ठाकरे हे या सोहळ्यातील प्रमुख पाहुणे असतील. 15 जूनला  संमेलनाचा समारोप होणार असून त्या कार्यक्रमाला शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते सुशिलकुमार शिंदे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.

राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून त्यांनीच ही सर्वपक्षीय संपर्क फॉर समर्थन मोहीम राबवली आहे! हत्वाचे राजकीय नेते आणि रंगकर्मी या निमीत्ताने एकाच रंगमंचावर येणार आहेत.संमेलनाचे स्वागताध्यक्ष विनोद तावडे यांनी कृष्णकुंज येथे जाऊन राज ठाकरे यांना संमेलनाचे निमंत्रण दिले होते. तर प्रसाद कांबळी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी सोमवारी मातोश्रीवर जाऊन उध्दव ठाकरेंची भेट घेतली होती.उध्दव यांनी हे निमंत्रण स्वीकारून समारोप कार्यक्रमाला येण्याचे मान्य केले. 

राजकारण्यांच्या सहभागामुळे मुलुंडचे नाट्यसंमेलन गाजणार आणि त्यात कोणते राजकीय नाट्यप्रवेश रंगणार याकडे रसिकांचे लक्ष लागले आहे.