Tue, Apr 23, 2019 06:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बिटकॉईन घोटाळ्यात राज कुंद्राची चौकशी

बिटकॉईन घोटाळ्यात राज कुंद्राची चौकशी

Published On: Jun 06 2018 2:09AM | Last Updated: Jun 06 2018 2:07AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

केंद्र सरकारने बेकायदेशीर ठरविलेल्या बिट कॉईन व्यवहारातील मनी लाँडरिंग प्रकरणासंदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने मंगळवारी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याची चौकशी केली. राज कुंद्राला ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. या व्यवहारात त्याचा काही सहभाग आहे का, यासंदर्भात त्याला प्रश्‍न विचारण्यात आले.

काही प्रकरणाचे धागेदोरे कुंद्रा यांच्याशी संबंधित असल्याचे दिसून आले आहे, त्यामुळे त्याला जबाब नोंदवण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती ईडीच्या अधिकार्‍यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली. काही दिवसांपूर्वी बिट कॉईनवर आधारित गुंतवणूक संकेतस्थळ गेन बिटकॉईन + आणि तिचा संस्थापक अमित भारद्वाज तसेच इतर आठजणांविरोधात ईडीने प्रीव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अ‍ॅक्ट (पीएमएलए) अन्वये फौजदारी गुन्हा दाखल केला होता. या संकेतस्थळाच्या योजनेत पैसे गुंतवून 8 हजार गुंतवणूकदारांनी 2 हजार कोटी रुपये गमावल्याचा आरोप आहे. ईडीने दाखल केलेला हा गुन्हा महाराष्ट्र पोलिसांच्या प्राथमिक माहिती अहवालावर आधारित आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणात अमित भारद्वाज आणि त्याचा भाऊ विवेक यांना दिल्लीतून यापूर्वीच अटक केली आहे. ईडीने या प्रकरणाच्या चौकशीची व्याप्ती वाढवली असून इतर तपास यंत्रणांच्या रडावर असलेल्या इतर बिटकॉईन तसेच क्रिप्टो करन्सी व्यवहारांची चौकशी सुरु केली आहे. भारद्वाज आणि त्याच्या सहकार्‍यांनी मुंबई, पुणे, नांदेड, कोल्हापूर आणि राज्यातील इतर शहरांत गुंतवणूकदारांना 2 हजार कोटींचा गंडा घातल्याची तक्रार आहे. भारतात आभासी चलनावर नियंत्रण ठेवणारी कोणतीही यंत्रणा नसल्याचे गेल्यावर्षी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत मान्य केले होते. बिटकॉईन तसेच यासारख्या इतर चलनांपासून सावधगिरी बाळगण्याचा इशारा सरकारने गुंतवणूकदारांना दिला आहे. या सगळ्या पाँझी स्कीम्स असून त्यांना कोणतेही कायदेशीर संरक्षण नाही, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.