Fri, Jul 19, 2019 00:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › घोडबंदर की ‘पूर’बंदर?

घोडबंदर की ‘पूर’बंदर?

Published On: Jul 10 2018 1:17AM | Last Updated: Jul 10 2018 1:09AMठाणे : पुढारी वृत्तसेवा

गेले 72 तास संततधार पडणार्‍या पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले. ठाण्यात 43 ठिकाणी पाणी तुंबले तर सहा ठिकाणी घर, नाला, संरक्षण भिंती कोसळल्या, शेकडो घरांमध्ये पाणी शिरले. दिवा, कळव्यात सर्वत्र पाणीच पाणी होते. घोडबंदररोडवरील चेना ब्रीज, काजूपाडा, गायमुख येथे महामार्गावर मोठ्याप्रमाणावर पाणी आल्याने काही लहान वाहने तरंगताना दिसत होती. खबरदारी म्हणून ठाणे ग्रामीण पोलिसांनी सकाळी हा राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी काही काळ बंद ठेवल्यानंतर पुन्हा रस्त्यावर वाहतूक सुरू झाली. 

सर्वाधिक 125 मिमी पाऊस पडणार्‍या भिवंडीतील अजमेर नगर येथे टेकडीचा काही भाग कोसळू लागल्याने झोपड्यांमधील 26 कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. मुसळधार पाऊस आणि खाडीला आलेल्या भरतीमुळे ठाणे, मुंब्रा, घोडबंदररोड, दिवा, कळव्यातील लोकांचे प्रचंड हाल झाले. कळवा रेल्वे स्थानकात नाल्याचे पाणी शिरले तर ठाणे स्थानकात नेहमीप्रमाणे पटरीवर पाणी साचल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. सतत पडणार्‍या मुसळधार पावसामुळे मुंबईप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली. तोपर्यंत विद्यार्थी शाळेत गेले होते. कळव्यातील सह्याद्री शाळेत पाणी साचल्याने तातडीने विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले. तर कासारवडवली येथील विहंग व्हॅली गृहसंकुलाची संरक्षण भिंत कोसळली आणि पाणी इमारतीमध्ये घुसली.इमारतीच्या लिफ्टमध्ये पाणी शिरल्याने रहिवाशांचे प्रचंड हाल झाले. नौपाडा, चरई, सिडको, घोडबंदररोडवली डीमार्ट, आनंदनगर, पातळीपाडा, अल्मेडा रोड, दिवा, मुंब्रा येथे पाणीच पाणी होते. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. शेकडो घरांमध्ये पाणी शिरले. सहा ठिकाणी संरक्षक भिंत, घराच्या भिंती कोसळल्या, सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही. मात्र घोडबंदर रोडवरील काजूपाडा, चेना ब्रीज आणि गायमुख येथे मोठ्याप्रमाणावर पाणी साचल्याने काही तास वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. गुजरातकडे जाणार्‍या या महामार्गावरील सखल भागात पाणी साचल्याने काही लहान वाहने तरंगताना दिसत  होते. मात्र कुठलीही वाहने वाहून गेली नाहीत, असे ग्रामीण पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

कल्याणातील 27 गावांमध्ये  नागरिकांचे प्रचंड हाल झाले तर भिवंडीतील पदमानगर , कमला हॉटेल , श्रीरंग नगर , कल्याण नाका , सिटीझन हॉस्पिटल , घुंगट नगर , किडवाई नगर , नागाव तलाव , जैतुनपुरा , हंडी कंपाऊंड , गैबीनागर , पाईपलाईन , मंडई बाजारपेठ , नदिनांका , खाडीपार , कामतघर , ईदगाह झोपडपट्टी या सखल भागात पाणी साचल्याने पुन्हा एकदा जनजीवन विस्कळीत झाले . नागाव येथील किडवाई नगरमधील सुमारे शंभराहून अधिक घरात पाणी शिरले होते. मीरारोड येथील शांतापार्क, बेकरी गल्ली, उत्तन, मीरारोड पश्‍चिमकडील सखल भागात पाणी शिरले होते. उत्तनमधील एका इमारतीमधील फ्लॅट कोसळल्याने एका कुटुंबाला सुरक्षित बाहेर काढण्यात आले. 

पंचनाम्यासाठी तलाठ्याकडे संपर्क करण्याचे आवाहन

ठाणे, कळवा आणि मुंब्रा परिसरात  काही चाळी आणि घरांमध्ये पाणी घुसून घरातील सामानाचे नुकसान झाले, त्यामुळे घरात पाणी शिरून नुकसान झालेल्या नागरिकांनी तहसिलदार कार्यालयात संपर्क साधून पंचनामे करून घ्यावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. मात्र, गतवर्षीच्या पावसातील नुकसान भरपाई अद्याप मिळाली नसून ठाणे महापालिकेने देखील करमाफी केलेली नाही.